शिक्षकांसाठी कार्यरत असलेली 'बीडीएस प्रणाली' बंद, ठेव अडकली; गरजेसाठी कर्ज घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:59 IST2025-08-07T18:58:57+5:302025-08-07T18:59:45+5:30
प्रणाली सुरू होणार कधी

संग्रहित छाया
सतीश पाटील
कोल्हापूर : राज्यातील शिक्षकांसाठी कार्यरत असलेली बीडीएस (बिल डिस्काउंटिंग सिस्टम) प्रणाली गेल्या महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. यामुळे राज्यातील शाळांमधील आठ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव रक्कम अडकून पडली असून, त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घर बांधकाम, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण तसेच अचानक उद्भवणाऱ्या आजारपणासाठी आवश्यक असलेली रक्कम वेळेत मिळत नसल्याने शिक्षक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
ही ठेव रक्कम शिक्षकांनी आपल्या पगारातून नियमितपणे वजा करून बीडीएस योजनेत गुंतवलेली असते. बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून शाळा, शिक्षण संस्था तसेच सहकारी बँका यांच्यामार्फत शिक्षकांना परतावा आणि नापरतावा या तत्त्वावर पैसे मिळतात. मात्र, गेल्या महिन्यापासून ही प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम शिक्षकांच्या आर्थिक व्यवहारांवर होत असून, आता गरज भासल्यावर त्यांनी खासगी पतसंस्था किंवा इतर बँकांकडे जास्त व्याजदराने कर्ज घेणे सुरू केले आहे.
शिक्षकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष
बीडीएस प्रणालीत अडथळा का निर्माण झाला याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड आहे की निधी अभावामुळे प्रणाली थांबवण्यात आली आहे, याबाबत अधिकृत खुलासाच करण्यात आलेला नाही.
प्रणाली सुरू होणार कधी
राज्य शासन किंवा शिक्षण विभागाकडून बीडीएस प्रणाली सुरू होणार असल्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. राज्यस्तरावर निर्णय प्रक्रियेत असून आर्थिक विभाग व संबंधित बँक यांच्यातील समन्वयातून ही प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ठोस तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. बीडीएस प्रणाली बंद असल्याने शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असून, गरजेच्या वेळी आपलेच पैसे मिळवण्यासाठी त्यांना व्याजाने कर्ज घ्यावे लागत आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही प्रणाली पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
बुधवारी पुण्यात बैठकीत शिक्षण संचालक महेश पालकर आणि दानी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पालकर आणि दाणी यांनी दूरध्वनीवरून एनआयसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन दिवसांत ई कुबेर प्रणालीत त्रुटी दूर होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. - आ. जयंत आसगावकर