'प्राडा'सोबतच्या करारातून व्यवसायवृद्धी व्हावा, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:16 IST2025-12-27T13:15:11+5:302025-12-27T13:16:54+5:30
करारामुळे कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असून त्याचा उपयोग येथील चर्मकार उद्योगाच्या व्यवसायवृद्धीसाठी व्हावा व येथे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होणेसाठी व्हावा

'प्राडा'सोबतच्या करारातून व्यवसायवृद्धी व्हावा, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची मागणी
कोल्हापूर : प्राडा, लिडकॉम, लिडकार यांच्यात झालेल्या कराराचा उपयोग कोल्हापुरातील चर्मकार उद्योगाच्या व्यवसाय वृद्धीसाठी व्हावा, या कराराची संपूर्ण माहिती मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे आजपर्यंत झालेला घटनाक्रम जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करत झालेल्या कराराची माहिती मिळावी, अशी विनंती केली. करारामुळे कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असून त्याचा उपयोग येथील चर्मकार उद्योगाच्या व्यवसायवृद्धीसाठी व्हावा व येथे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होणेसाठी व्हावा अशी मागणी त्यांनी केली. भूपाल शेटे यांनी लिडकॉमच्या कार्यालयात असणाऱ्या समस्या मांडल्या व तेथील गैरकारभाराबाबत आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची विनंती केली.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पूर्वी कोल्हापुरी चप्पलची ओळख फक्त देशपातळीवर होती. परंतु या करारामुळे कोल्हापूरची ‘मेड इन कोल्हापूर’ अशी आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होणार असून जिल्ह्याच्या परंपरेचा सन्मान वाढणार आहे. या भागीदारीमुळे कारागिरांना प्रशिक्षण, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
या कराराचा फायदा दोन-चार महिन्यांत दिसून येईल असे सांगत कराराबाबत कोणताही गैरसमज पसरणार नाही याची काळजी चप्पल उत्पादकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. लिडकॉमबाबत असणाऱ्या शंका तेथील कार्यालयास भेट देऊन दूर केल्या जातील तसेच कराराबाबत सविस्तर माहितीसाठी लवकरच सर्वांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा फुटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, उपाध्यक्ष राजन सातपुते, दीपक खांडेकर, बाळासाहेब गवळी, मनोज गवळी, विलास मालेकर, अशोक गायकवाड, राहुल नष्टे उपस्थित होते.