Kolhapur: पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केली तब्बल १९४ चिन्हे; गाजर, केळी वगळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:28 IST2025-11-17T17:27:33+5:302025-11-17T17:28:48+5:30
Local Body Election: नवी कोणती चिन्हे आली.. जाणून घ्या

Kolhapur: पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केली तब्बल १९४ चिन्हे; गाजर, केळी वगळली
संदीप बावचे
जयसिंगपूर / शिरोळ : निवडणूक म्हटलं की चिन्ह आलेच. त्याशिवाय प्रचार कसा होईल. यंदा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तब्बल १९४ चिन्हे जाहीर केली आहेत. गाजर, केळी ही चिन्हे वगळण्यात आली असून, नव्याने भेंडी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फुलकोबी अशी चिन्हे आली आहेत. ग्रामीण जीवन व दैनंदिन व्यवहाराशी निगडीत वस्तूंचा चिन्हात समावेश दिसून येत आहे.
जिल्ह्यात तेरा नगरपालिका, नगरपंचायतीसाठी निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराने संभाव्य चिन्हाची मागणी करणे अपेक्षित आहे. निवडणुकीत अपक्षांना क्रमवारीनुसार चिन्हांचे वाटप करण्यात येते. चिन्ह निवडण्यासाठी नगरपालिका कार्यालयासमोर चिन्हांचा जम्बो फलक लावण्यात आला असून, तो लक्ष वेधून घेत आहे.
भेंडी, हिरवी मिरची, फुलकोबी चिन्हे
मागील निवडणुकीत लोकप्रिय ठरलेली गाजर, केळी आणि टरबूज ही चिन्हे यंदा यादीतून वगळली आहेत. त्या चिन्हांच्या जागी भेंडी, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फुलकोबी ही भाज्यांची चिन्हे आहेत. भुईमूग शेंग, वाटाणा, फणस, मका, कणीस ही भाजीपाल्याची चिन्हे आली आहेत.
भाजीपाल्याबरोबरच फळांची चिन्हे
फक्त फुले नव्हे तर यावेळी भाज्या, शेंगा, फळे, धान्य आणि घरगुती वस्तू निवडणूक चिन्ह म्हणून समोर येत आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्यास अनेक चिन्हे मतदारांसमोर येऊ शकतात.
फणस विरुद्ध कणीस, भेंडी विरुद्ध मिरची
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत फणस विरुद्ध मका, कणीस, भेंडी विरुद्ध मिरची अशा नव्या प्रकारच्या प्रतीकात्मक लढतीचा रंगही या निवडणुकीत पहायला मिळू शकतो. निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे. निवडणुकीचा राजकीय आखाडा आता भाजीपाला आणि शेतमालाच्या चिन्हांनी रंगणार आहे. त्यामुळे पालिकेसमोर लावण्यात आलेला फलक लक्षवेधी ठरत आहे.