Kolhapur: गोऱ्या गालावर लाजेची लाली.. पूजा आमची नवरी झाली; बालकल्याणमधील ७५ व्या लेकीचा विवाह थाटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:31 IST2025-12-17T12:30:23+5:302025-12-17T12:31:50+5:30
सजलेला मांडव, सनईचा मंजूळ स्वर, पोलिस बँड, ढोल-ताशांचा गजर, पाहुणे मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

Kolhapur: गोऱ्या गालावर लाजेची लाली.. पूजा आमची नवरी झाली; बालकल्याणमधील ७५ व्या लेकीचा विवाह थाटात
कोल्हापूर : ‘गोऱ्या गोऱ्या गालावरी सजली लाजेची लाली गं पोरी.. पूजाताई आमची नवरी झाली’ अशाच प्रेमळ, आनंददायी आणि सुखद भावना मंगळवारी बालकल्याण संकुलमधील मुला-मुलींच्या होत्या. सजलेला मांडव, सनईचा मंजूळ स्वर, पोलिस बँड, ढोल-ताशांचा गजर, पाहुणे मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत ‘बालकल्याण संकुल’ची लेक पूजा हिची लग्नगाठ विश्वजित विजय पुजारी (खानापूर, भुदरगड) यांच्याशी बांधली गेली. संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
निराधारांवर मायेचा पदर धरणाऱ्या ‘बालकल्याण संकुल’मध्ये वाढलेली पूजा ही ७५ वी लेक सुखी जीवनाच्या बोहल्यावर चढली. तिला हक्काचे घर, मायेची माणसं मिळाली. गेली आठ दिवस संस्थेत साखरपुडा, मुहूर्तमेढ, हळदी विधी पार पडले. मंगळवारी सायंकाळी ५ च्या मुहूर्तावर अक्षता पडताच नटून-थटून बसलेल्या मुला-मुलींनी पोलिस बँड आणि ताशांच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला. कोल्हापूरकरांच्या शुभाशीर्वादात वधू-वर न्हाऊन निघाले.
‘लोकमत’चे उपवृत्तसंपादक विश्वास पाटील, साताऱ्याच्या महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी मुलीचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. यावेळी उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांच्यासह बालकल्याण समितीसह संबंधित शासकीय कार्यालये, संस्थेचे मान्यवर, देणगीदार, शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.