धामोड-शिरगांव परिसरात आढळलेला 'तो' प्राणी तरसच, वन अधिकाऱ्यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:37 IST2023-04-05T16:37:07+5:302023-04-05T16:37:28+5:30
श्रीकांत ऱ्हायकर धामोड/शिरगांव: धामोड-शिरगाव घाटाच्या दरम्यान पिंपरीचा माळ नावाच्या शेतामध्ये आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याचे आज वन विभागाने स्पष्ट ...

धामोड-शिरगांव परिसरात आढळलेला 'तो' प्राणी तरसच, वन अधिकाऱ्यांचा खुलासा
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड/शिरगांव: धामोड-शिरगाव घाटाच्या दरम्यान पिंपरीचा माळ नावाच्या शेतामध्ये आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याचे आज वन विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कालच म्हासूर्ली वन परिमंडळाचे वनपाल विश्वास पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरती जाऊन ठशाचे नमुने घेतले होते.
धामोड व शिरगाव दरम्यान असणाऱ्या घाट परिसरामध्ये बुरंबाळी व शिरगाव येथील काही शेतकरी शेतामध्ये राखणीसाठी वस्तीला असतात. काल रात्री शिरगाव येथील काही शेतकऱ्यांना हा प्राणी मुगाच्या शेतामध्ये वावरताना दिसला. तरसाच्या ओरडण्यावरून हे शेतकरी भयभीत झाले. या प्राण्याला हुसकावण्यासाठी शेतात शेकोटी पेटवत ओरडून त्याला पळवून लावले.
यानंतर दोन्ही गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना पिपरीचा नावाच्या शेतामध्ये तरच प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. यावरुन हा बिबट्या नसून तरस असल्याचे वनअधिकाऱ्यांनी घोषित केले.