पानसरे खटला सुनावणीत दोन पंचांच्या साक्ष पूर्ण, पुढील सुनावणी १७ ऑगस्टला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 21:41 IST2023-08-01T21:41:19+5:302023-08-01T21:41:36+5:30
संशयित आरोपींची व्हीसीद्वारे उपस्थिती

पानसरे खटला सुनावणीत दोन पंचांच्या साक्ष पूर्ण, पुढील सुनावणी १७ ऑगस्टला
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्याची सुनावणी मंगळवारी (दि. १) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर झाली. पानसरे यांच्या शरीरातील गोळी जप्तीचे पंच साक्षीदार आणि संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या वाहनातील पुस्तक जप्तीच्या पंच साक्षीदारांचा सरतपास आणि उलट तपास झाला
गंभीर जखमी अवस्थेतील पानसरे यांच्यावर उपचार करताना शरीरातील गोळी काढली होती. त्यावेळचे पंच साक्षीदार शिवाजी जानबा शिंदे (सध्या रा. निपाणी, जि. बेळगाव, मूळ रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांची साक्ष न्यायाधीशांसमोर नोंदवली. संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या अटकेनंतर त्याच्याकडील वाहनातून (धर्मरथ) काही पुस्तके, त्यातील फाटलेली पाने पोलिसांनी जप्त केली होती. त्यावेळचे पंच साक्षीदार सुनील तानाजी जाधव (रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर, आदींनी साक्षीदारांचा उलट तपास घेतला. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. निंबाळकर यांच्यासह ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. विवेक पाटील यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी १७ आणि १८ ऑगस्टला होणार आहे