शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून मोरेवाडीत नंग्या तलवारी घेऊन दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:14 IST2020-05-14T17:09:07+5:302020-05-14T17:14:15+5:30
शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून सातजणांनी नंग्या तलवारी नाचवत तरुणांसह दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील पाचगाव येथे घडला. या प्रकाराची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.

शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून मोरेवाडीत नंग्या तलवारी घेऊन दहशत
कोल्हापूर : शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून सातजणांनी नंग्या तलवारी नाचवत तरुणांसह दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील पाचगाव येथे घडला. या प्रकाराची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
याबाबतची तक्रार जखमी ओंकार सदाशिव मोरे (वय ३२, रा. सावकार कॉलनी, मोरेवाडी) यांनी दिली. या प्रकरणी अमोल महादेव मोरे, दत्तात्रय शामराव मोरे, अमोल प्रकाश जाधव, अमित कृष्णात कोईगडे व इतर तिघेजण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती, ओंकार मोरे हे मोरेवाडी (ता. करवीर) येथील सावकार कॉलनीत राहतात. त्यांच्या शेतीच्या व घराच्या वादातून मंगळवारी (दि. १२) सकाळी संशयित अमोल मोरे, दत्तात्रय मोरे, अमोल जाधव, अमित कोईगडे (सर्व रा. मोरेवाडी) व बाळासाहेब मोरे यांचे जावई (पूर्ण नाव नाही) यांसह अन्य दोघे असे एकूण सातजण दोन आलिशान मोटारी व दुचाकीवरून सावकार कॉलनीत आले. सर्वांच्या हातांत नंग्या तलवारी होत्या. त्यांनी प्रथम परिसरात दहशत माजवली.
ओंकार व त्याच्या चुलत्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. काही वेळ दहशत माजविल्यानंतर हे हल्लेखोर एक आलिशान मोटार व दुचाकी घटनास्थळी टाकून पळून गेले.
घटनेनंतर जखमी ओंकार याने करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये त्या हल्लेखोरांपासून आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार सात संशयितांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.