Kolhapur: महिलेच्या मृत्यूनंतर सीपीआरमध्ये तणाव, तिघे डॉक्टर सक्तीच्या रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:31 IST2025-05-06T12:31:29+5:302025-05-06T12:31:52+5:30
मिरगुंडे यांना केले पदमुक्त

Kolhapur: महिलेच्या मृत्यूनंतर सीपीआरमध्ये तणाव, तिघे डॉक्टर सक्तीच्या रजेवर
कोल्हापूर : मोतीबिंदू ऑपरेशनच्याआधी रक्तातील साखर पाहण्यासाठी डॉक्टर रक्त घेत होते. अशातच हृदयविकाराचा जाेरदार झटका आला आणि उपचार सुरू असतानाच शकुंतला मधुकर पवार (वय ६५ रा. राजेंद्रनगर) यांचा अचानक मृत्यू झाला.
या मृत्यूस सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी अडीच तास सीपीआरमध्ये ठिय्या मारला आणि डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली.
अखेर वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिशिर मिरगुंडे यांना पदमुक्त करण्यात आले. डॉ. अभिजित ढवळे, डॉ. अमृता बिलावल आणि डॉ. अंजूसिंग या तीन डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
सीपीआरमधून सांगण्यात आले की सकाळी ११:३० च्या दरम्यान पवार या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. त्यांना मधुमेह आहे का हे पाहण्यासाठी तेथील निवासी डॉक्टरांनी शिरेतून रक्त घ्यायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना फीटसदृश्य झटका आला आणि त्या खाली कोसळल्या. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्या प्लॅस्टिक, भंगार गोळा करून कुटुंब चालवत होत्या. त्यांच्या अशा अचानक निधनाने कुटुंबीयांना धक्का बसला.
निधनाची माहिती कळताच नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी डॉक्टरांकडे याबाबत विचारणा सुरू केली. नातेवाइकांनी फोन करून आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांना बोलावून घेतले. दत्ता मिसाळ, जयसिंग पाडळीकर, सुशील कांबळे युवराज कांबळे आदी कार्यकर्त्यांसह ते सीपीआरमध्ये आले. त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्यासह डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. जोपर्यंत याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका सर्वांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
डॉ. माेरे यांनीही त्या सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वैद्यकीय अधीक्षक मिरगुंडे यांच्यासह संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी अखेरपर्यंत सर्वांनी लावून धरली. या प्रकारामुळे सीपीआर प्रशासनाने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीराम कणेरकर हेदेखील या ठिकाणी आले. अखेर या प्रकरणी डॉ. मिरगुंडे यांना मूळ विभागात पाठण्याबरोबरच तीन डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. तर या प्रकरणी चौकशी समितीही नेमण्यात आली.
मानसिक खच्चीकरण नको
दरम्यान, या कारवाईमुळे डॉक्टरांमध्ये अस्वस्थता पसरली. या महिलेचे वय अधिक असल्याने त्यांना फेऱ्या मारायला लागू नयेत यासाठी रक्त तपासून त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठीची तयारीही आम्ही केली होती. परंतु साखर तपासण्यासाठी रक्त घेताना त्यांना तीव्र झटका आला. त्यांच्यावर अत्यावश्यक उपचार केल्यानंतरही त्यांचा मृत्यू झाला. परंतु यात नेत्रविभागाच्या कोणत्याच डॉक्टरांची चूक नाही. ही अचानक घडलेली घटना आहे. त्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्याकडे डॉक्टरांनी केली आहे. या विभागाने याआधीही उत्तम काम केले आहे. त्यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण करू नका अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.