‘एमआयएम’च्या कार्यालयावरून कोल्हापुरातील बागल चौकात तणाव, स्थानिकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:04 IST2025-09-29T12:03:49+5:302025-09-29T12:04:38+5:30
पार्किंगच्या जागेतील कार्यालयास मनपाची नोटीस, पोलिस बंदोबस्त तैनात

‘एमआयएम’च्या कार्यालयावरून कोल्हापुरातील बागल चौकात तणाव, स्थानिकांचा विरोध
कोल्हापूर : येथील बागल चौक परिसरात एमआयएम पक्षाचे कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून, याला स्थानिकांसह सकल हिंदू समाजाने जोरदार विरोध केला आहे. कार्यालयास परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी निवेदनाद्वारे शाहूपुरी पोलिसांकडे केली. तसेच पार्किंगच्या जागेत अनधिकृत कार्यालय थाटत असल्याबद्दल महापालिका प्रशासनाने वादग्रस्त जागेत नोटीस चिकटवली आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एमआयएम पक्षाकडून कोल्हापूरच्याराजकारणात शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी बागल चौकातील एका इमारतीत कार्यालयाची तयारी केली असून, सोमवारी (दि. २९) पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची माहिती मिळताच रविवारी सकाळी बागल चौक मित्र मंडळासह सकल हिंदू समाज आणि स्थानिक नागरिकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन कार्यालयास परवानगी नाकारण्याची मागणी केली.
तसेच सोमवारी दुपारी बागल चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याचा इशारा दिला. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी बागल चौकात जाऊन कार्यालयाची पाहणी केली.
कारवाईचा इशारा
महापालिकेच्या नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले हेदेखील बागल चौकातील कार्यालयात पोहोचले. पार्किंगच्या जागेत अनधिकृत कार्यालय थाटल्याची नोटीस त्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात चिकटवली. तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. याचवेळी सकल हिंदू समाजाचे काही कार्यकर्ते बागल चौकात गेल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्या पथकासह राखीव दलाची एक तुकडी तैनात केली होती.