Kolhapur: बास्केट ब्रीज, कागल उड्डाणपुलासाठी १०५० कोटी रुपयांची निविदा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:39 IST2025-11-06T16:38:23+5:302025-11-06T16:39:01+5:30
काम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे

Kolhapur: बास्केट ब्रीज, कागल उड्डाणपुलासाठी १०५० कोटी रुपयांची निविदा जाहीर
सतीश पाटील
कोल्हापूर : पुलाची शिरोलीजवळील सांगली फाटा ते उचगावदरम्यान सुमारे ४,८०० मीटरपर्यंतच्या पिलरचा उड्डाणपूल व बास्केट ब्रिज आणि कागल येथे अडीच किलोमीटर चा उड्डाणपूल करण्याच्या प्रकल्पाची निविदा अखेर केंद्र शासनाने सोमवारी (दि. ३) केली. दोन्ही उड्डाणपुलांसाठी सुमारे १०५० कोटी रुपयांची निधी लागणार असल्याचे निवेदेत म्हटले आहे.
भोपाळ येथील एल. एन. मलविया कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जून महिन्यात केंद्र शासनाला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला होता.
पंचगंगा नदीवर बंधारा तयार होऊन पाण्याची फुगी वाढून नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका निर्माण होणार होता. यासाठी शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे पूलदरम्यान महामार्गावर पिलरचा उडुाणपूल उभा करावा अन्यथा काम बंद पाडू, असा इशारा देत पूरग्रस्त समितीने पंचगंगा नदीपुलाजवळ ठिय्या आंदोलन केले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनीसुद्धा ही मागणी उचलून धरली होती, त्यामुळे सांगली फाटा ते उचगावदरम्यान पिलरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी नवीन डीपीआर तयार केला आणि तो जूनमध्ये केंद्र शासनाकडे पाठवला, त्याची निविदा सोमवारी प्रसिद्ध झाली.
शिरोली सांगली फाटा ते उचगाव दरम्यान ४,८०० मीटरचा पिलरवरील उड्डाणपूल कोल्हापूर शहरात जाण्यासाठी शिरोली सांगली फाटा येथून शिरोली जकात नाकापर्यंत बास्केट ब्रिज आणि कागल येथे अडीच किलोमीटरचा उड्डाणपूल तसेच पंचगंगा नदीवरील पूल रेल्वे ब्रिज येथील पूल उभारण्यात येणार आहे. आता प्रतीक्षा टेंडरची असून, हे काम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
'बास्केट ब्रीज'साठी ७५० कोटींची निविदा
कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिलरचे पूल आणि तावडे हॉटेल येथे बास्केट ब्रीजसाठी ७५० कोर्टीची निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. निविदा भरण्याची अंतिम २ मुदत १९ डिसेंबर आहे. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
उड्डाणपूल
- शिरोली ते उचगाव उड्डाणपुलाची लांबी : ४८४१ मीटर
- पंचगंगा नदीवर पूल,
- रेल्वे उड्डाणपूल
- कागल उड्डाणपूल : २६३४ मीटर
- सांगलीहून कोल्हापूरला महामार्गावर येण्यासाठी ३४५ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
- महामार्गावरून सांगली फाटा येथे उतरण्यासाठी २७० मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
- कोल्हापूरहून महामार्गावरती येण्यासाठी २९५ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
- महामार्गावरून कोल्हापुरात जाण्यासाठी ३०७ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
- महामार्गावरून गांधीनगरला जाण्यासाठी २०९ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
- गांधीनगरवरून महामार्गावर येण्यासाठी ३०० मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.