प्रवृत्ती, राजकीय वर्चस्वाची लढाई

By Admin | Updated: October 9, 2014 23:02 IST2014-10-09T21:37:01+5:302014-10-09T23:02:23+5:30

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व कुणाचे, हे ठरविणारी ही निवडणूक

The tendency, the battle of the political domination | प्रवृत्ती, राजकीय वर्चस्वाची लढाई

प्रवृत्ती, राजकीय वर्चस्वाची लढाई

विश्वास पाटील - कोल्हापूर -  दक्षिण मतदारसंघातील निवडणूक माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्यापेक्षा ती सतेज पाटील विरुद्ध आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व कुणाचे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. महाडिक यांची सोयीनुसार बदलत जाणारी राजकीय भूमिका हा या लढतीतला प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला आहे.या लढतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. मतदानाचा दिवस जवळ येईल तसा या प्रचारातील विखार वाढणार आहे. आताही एकमेकांची उणीदुणी काढणे सुरू आहे. यापुढे आणखी कोणती बदनामीची अस्त्रे बाहेर काढणार याविषयी मतदारांत उत्सुकतेपेक्षा भीतीच आहे. ‘दक्षिण’ची गतनिवडणूकही राज्यात गाजली. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्यात मनोमिलन झाल्याने यंदा फारशी चुरस असणार नाही, असे चित्र काही दिवसांपर्यंत होते; परंतु मुलास सत्तेचे पद दिले नाही म्हणून आमदार महाडिक यांचा अहंकार दुखावला व त्यातून महाडिक-सतेज पाटील यांच्यातील संघर्ष नव्याने उफाळून आला. आता आमदार महाडिक, खासदार धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी ही लढाई आहे. सुरुवातीच्या टप्प्यात खासदार आपण धर्मसंकटात असल्याचे सांगत होते; परंतु त्यांनीही सतेज पाटील यांनी केलेल्या मदतीवरच प्रश्नचिन्ह लावले. सतेज पाटील यांची विजयासाठी मदत झाली, असे जाहीरपणे सांगणारे खासदार महाडिक आता त्याच्या बरोबर उलटे बोलत आहेत. त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक ह्या भाजपच्या व्यासपीठावरून पती धनंजय यांना ‘राष्ट्रवादी’चा खासदार म्हणून निवडून दिल्याबद्दल आभार मानत आहेत. स्वाभिमानी जनतेने खासदार महाडिक यांना निवडून दिले, त्याचे श्रेय कुणी घेऊ नये, असे त्यांचे म्हणणे. मतदार हे सगळे पाहत आहे, वाचत आहे. तो प्रतिक्रिया देत नाही; परंतु जे सुरू आहे त्याबद्दल त्याचीही काही भूमिका आकार घेत आहे. तीच या मतदारसंघाचा आमदार कोण हे निश्चित करणारी आहे. उमेदवार म्हणून अमल महाडिक यांचा प्रचाराचा सगळा रोख नकारात्मक आहे. सतेज पाटील यांनी हे केले नाही अशा अनेक प्रश्नांची यादीच रोज वाचून दाखवित आहेत. अमल यांचा भाजपमधील प्रवेश २५ सप्टेंबरला झाला. त्याच्याअगोदर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. ते स्वत:ही त्या पक्षाचेच नेते होते. मग जे प्रश्न आता ते वाचून दाखवित आहेत, ते सोडविण्यासाठी त्यांनी काय ताकद लावली हे कुणीच सांगायला तयार नाही. आमदार महाडिक यांनी आमदार
म्हणून त्यासाठी काय प्रयत्न केले व या मतदारसंघासाठी अमल महाडिक यांच्या मनात विकासाचा कोणता आराखडा आहे हे जनतेला समजत नाही. प्रा. जयंत पाटील यांच्यासह काही मंडळी जे आरोप करत सुटली आहेत, त्यात समाजहितापेक्षा राजकीय सूड ही भावना जास्त आहे. मतदारसंघातील सध्याचा माहौल तरी असा आहे. शिवसेनेचे विजय देवणे अपुऱ्या साधनांसहमतदारांपर्यंत जाऊन भूमिका सांगत आहेत. सतेज पाटील यांच्यावर जुन्याच टीकेचा रोख अधिक तिखटपणे सुरूझाल्याने तेदेखील हैराण झाले आहेत.

कोल्हापूर दक्षिण
एकूण मतदार ३,0७,६४९

प्रचारातील मुद्दे
महाडिक यांची बदलती राजकीय भूमिका
लोकसभेतील पाठिंब्याचे राजकारण
थेट पाईपलाईनवरून आरोप-प्रत्यारोप
ऊस आंदोलनातील नाराजी
राजकारणाचे गुन्हेगारीकरण

Web Title: The tendency, the battle of the political domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.