शिक्षक बँकेत सुडाचे राजकारण

By Admin | Updated: August 27, 2015 00:39 IST2015-08-27T00:39:06+5:302015-08-27T00:39:06+5:30

पाटील, कारंडेंचा आरोप : आकस्मिक कर्ज रोखले, अध्यक्षांचा आठमुठेपणा

Teacher Politics of the Bank | शिक्षक बँकेत सुडाचे राजकारण

शिक्षक बँकेत सुडाचे राजकारण

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासद तुषार पाटील हे आकस्मिक कर्जासाठी पात्र असताना बँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी त्यांचे कर्जप्रकरण रोखले. पाटील यांची आई गंभीर आजारी असताना, सत्ताधारी मंडळींनी सुडाचे राजकारणातून अडवणूक सुरू केल्याचा आरोप बँकेचे संचालक प्रसाद पाटील व शिक्षक नेते कृष्णात कारंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पाटील व कारंडे म्हणाले, तुषार माणिकराव पाटील (विद्यामंदिर आरळे, करवीर) यांना मातोश्री सुनीता पाटील या गंभीर आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपये आकस्मिक कर्ज हवे होते. त्यांनी बुधवारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून करवीर शाखेत अर्ज दाखल केला, पण कर्ज नामंजूर केल्याचे शाखाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन भारते यांच्याकडे चौकशी केली असता, बँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांच्या सूचनेनुसार व त्यांच्याशी केलेल्या चर्चेअंती आपले कर्ज नामंजूर केल्याचे लेखीच पाटील यांना दिले. मला चैनीसाठी नव्हे; तर आई आजारी असल्याने कर्जाची गरज असल्याची विनवणी त्यांनी भारते यांना केली, पण मला कर्ज देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आम्ही जाब विचारला, अध्यक्षांच्या सूचना असल्याने मला काहीही करता येत नसल्याचे भारते यांनी सांगितले. आम्ही अध्यक्ष राजमोहन पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. निवडणुकीपुरते राजकारण आम्ही समजू शकतो, पण सभासदांच्या हक्कातही कोणी राजकारण आणणार असेल तर त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांनी दिला. याबाबत जिल्हा उपनिबंधक व सहकार न्यायालयात दाद मागणार असून या प्रवृत्तीला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे पाटील व कारंडे यांनी सांगितले. सभासदांच्या हितासाठी बँक आहे, असा आडमुठेपणा करून अध्यक्ष कोणाचे हित जोपासत आहेत. बँक राजमोहन पाटील यांची आहे का? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावेच लागेल, असे संचालक लक्ष्मी पाटील म्हणाल्या. सभेत ९० टक्के सभागृह विरोधात होते, बोगस ताळेबंदाचे पितळ उघडे पडणार हे लक्षात आल्यानंतर सभा गुंडाळून त्याचे खापर विरोधकांवर फोडले; पण सभासद सुज्ञ व जाणते आहेत, ते योग्यवेळी उत्तर देतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे संचालक सुरेश कोळी, अरुण पाटील, डी. जी. पाटील, सतीश बरगे, शंकर पोवार, तुषार पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher Politics of the Bank