Kolhapur: 'तारा' वाघिणीचा कोअर क्षेत्रात ५० किलोमीटरहून अधिक मुक्त संचार, व्हिडिओ व्हायरल
By संदीप आडनाईक | Updated: December 4, 2025 13:52 IST2025-12-04T13:50:09+5:302025-12-04T13:52:24+5:30
हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न, पाणवठ्याचे करतीये पाहणी..

Kolhapur: 'तारा' वाघिणीचा कोअर क्षेत्रात ५० किलोमीटरहून अधिक मुक्त संचार, व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर : ताडोबामधून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त दाखल झालेल्या 'चंदा' म्हणजेच 'तारा' या वाघिणीला गेल्या आठवड्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सध्या ती हवामानाशी जुळवून घेण्याची आणि क्षेत्रचिन्हीकरणाच्या तयारीत गाभा क्षेत्रात मुक्त संचार करत आहे. तिच्या गळ्यात लावलेल्या 'रेडिओ काॅलर'च्या आधारे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या अधिकाऱ्यांनी तिचे काही व्हिडिओ व्हायरल केले आहेत. आतापर्यंत तिने गाभा क्षेत्रात ५० किलोमीटरहून अधिक मुक्त संचार केला आहे.
व्याघ्र संख्या वाढविण्यासाठी दृष्टीने 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'चा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सह्याद्रीत आल्यानंतर 'तारा' ( सांकेतिक क्रमांक 'एसटीआर-०४') वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानात तयार केलेल्या विलग्नवासाच्या पिंजऱ्यांमध्ये ठेवले होते. तिच्यावर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन आणि निरीक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. १८ नोव्हेंबर रोजी तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. तरीही दोन दिवस ती त्याच विलग्नवासाच्या पिंजऱ्यात राहिली. वन विभागाने तेथे सोडलेल्या भक्षाची तिने शिकारही केली.
दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला तरी ती बाहेर गेली नाही. मात्र, २० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता अत्यंत डौलदारपणे पिंजऱ्यामधून बाहेर पडून ती जंगलात निघून गेली. आता चांदोली अभयारण्य परिसरातील गाभा क्षेत्रात तिची भटकंती सुरु आहे. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात येत आहे.
५० किलोमीटरपेक्षा जास्त भ्रमंती
ताराने आतापर्यंत चांदोली गाभा क्षेत्रात ५० किलोमीटरहून अधिक अंतराची भ्रमंती केली आहे. आता ती पाण्याच्या जागा, घर करण्यासाठी सुरक्षित निवारा, भक्ष्याची सोय, हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविली असून तिचे सॅटेलाईट टेलिमेट्री आणि वीएचएफ ॲंटिनाव्दारे २४ तास पर्यवेक्षण केले जात आहे. फील्ड पथकाद्वारे क्षेत्रनिहाय पडताळणी, हालचाल, निवासस्थाने व शिकार पद्धतीचे नोंदवही लेखन आणि तत्पर पशुवैद्यकीय पथक व्यवस्था यामार्फत वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. -तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प