Tala-thok agitation at the MSEDCL gate of Gadhinglaj | गडहिंग्लजच्या महावितरण गेटला ताला-ठोक आंदोलन

गडहिंग्लज येथे जनता दलातर्फे महावितरण कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा. मोर्चात नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाळेश नाईक, रमेश मगदूम, बाळकृष्ण परीट आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या महावितरण गेटला ताला-ठोक आंदोलन घरगुती वीजबीले त्वरीत माफ करा, जनता दलाची मागणी 

गडहिंग्लज : दरमहा ३०० युनीटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीजग्राहकांची वीजबीले तातडीने माफ करा, अशी मागणी जनता दलातर्फे करण्यात आली. या मागणीसाठी गडहिंग्लज येथील महावितरण कार्यालयाच्या गेटला टाळे लावून ताला -ठोक आंदोलन करण्यात आले.

शहरातील कडगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहापासून महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. कार्यालयाच्या गेटसमोर आल्यानंतर आंदोलकांनी गेटला टाळे लावले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांना नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी मार्गदर्शन केले.

नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, देशातील केरळसह अन्य राज्यात वीजबीलात ५० टक्के सवलत देवून नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनामुळे जगणे मुश्किल झालेल्या नागरिकांच्या घरगुती वीजदरात वाढ केली आहे. हे अन्यायी धोरण आहे. राज्यातील पुरोगामी शासनाने घरगुती वीजबीले माफ करून आपले पुरोगामित्व सिद्ध करावे.

नाईक म्हणाले, कोरोना संकटकाळात नागरिकांचे व्यवसाय बंद पडले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अशा काळातील वीजबीले माफ झाली पाहिजेत. शासनाने वीजबीले तात्काळ माफ करावीत अन्यथा भविष्यात उग्र आंदोलन छेडले जाईल.

उपनगराध्यक्ष कोरी म्हणाले, घरगुती वीज ग्राहकांची वीजबीले माफ करण्याची मागणी रास्त आहे. लॉकडाऊन काळातील वीजबीलांमध्ये १ ते १०० युनीट आणि १०० ते ३०० युनीटच्या आकारणीमध्ये केलेली साडेसोळा टक्के आणि साडेतेरा टक्केंची दरवाढ अन्यायकारक आहे. वीजबीलात सवलत देण्याची घोषणा करणारे सरकार फसवे आहे.
यावेळी महावितरण अभियंता दांगट यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनस्थळी पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सपोनि दिनेश काशीद यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनात नगरसेवक उदय कदम, क्रांतीदेवी शिवणे, शकुंतला हातरोटे, सुनिता पाटील, नाज खलिफा, हिंदूराव नौकुडकर, काशिनाथ देवगोंडा, बाळकृष्ण परीट, मालतेश पाटील, शशीकांत चोथे, रमेश मगदूम, रमेश पाटील, अवधूत पाटील, सागर पाटील, प्रकाश तेलवेकर, मोहन भैसकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 

Web Title: Tala-thok agitation at the MSEDCL gate of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.