पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर येताच निलंबन, कोल्हापूर जिल्हा परिषदेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:29 IST2025-05-02T14:28:13+5:302025-05-02T14:29:52+5:30
एकाच दिवशी ‘बांधकाम’चा शिपाई तांदळे, ग्रामसेवक सूर्यवंशी, औषध निर्माण अधिकारी बिल्ले निलंबित झाल्याने खळबळ

पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर येताच निलंबन, कोल्हापूर जिल्हा परिषदेत खळबळ
कोल्हापूर : पंधरा दिवसांच्या रजेवर जाणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बुधवारी तब्बल तिघांचे निलंबन करून कारवाईचा दणका दिला. कहर म्हणजे बांधकाम खात्याचा शिपाई विजय आनंदा तांदळे अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर पैसे मोजत असतानाचा व्हिडीओ थेट कार्तिकेयन यांनाच पाठविण्यात आल्याने त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
तर पणुत्रे ता. शाहूवाडीचा ग्रामसेवक शांतीनाथ सूर्यवंशी आणि औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यालाही निलंबनाचा तडाखा देण्यात आला. रात्री आठच्या सुमारास काढण्यात आलेल्या या निलंबन आदेशामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
बांधकाम विभागातील खाबूगिरीचे एक एक किस्से समोर येत असताना मंगळवारी संध्याकाळी कार्तिकेयन यांना एक व्हिडीओ आला. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाबाहेर तांदळे नोटा मोजत होता. यावेळी काही ठेकेदारही तिथे उपस्थित होते. आधीच बांधकामच्या कारभारावर तीव्र नाराज असलेल्या कार्तिकेयन यांनी बुधवारीच प्रक्रिया पूर्ण करून त्याला निलंबित करून टाकले. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे त्याने रोज उपस्थित राहायचे आहे.
शाहूवाडी तालुक्यातील पणुत्रे येथील गायरानासह वनखात्याच्या हद्दीतील तोड चर्चेत आली होती. येथील ग्रामसेवक शांतीनाथ सूर्यवंशी यांनी एकीकडे मूल्यांकन कमी केले. शिवाय ठेकेदाराने परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडली. या सर्व प्रक्रियेत सूर्यवंशी यांनी दुर्लक्ष करून शासनाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचे मुख्यालय आजरा ठेवण्यात आले आहे.
तिसऱ्या प्रकरणात मुख्य औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांना निलंबित करण्यात आले आहे. कोविड काळात औषध वितरणात अनियमितता, ठेकेदारांची सुरक्षा ठेव वेळेत न देणे, दप्तर अद्ययावत न ठेवणे, औषध वितरणातील अनियमिततेचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. बिल्ले सध्या चंदगड तालुक्यातील अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कार्यरत आहेत. त्यांना शाहूवाडी पंचायत समितीमध्ये रोजची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाचा एक अधिकारी रडारवर
बांधकाम विभागाचा टाक्यांची परस्पर विल्हेवाट करण्याच्या प्रकरणातील एक अधिकारी निलंबनासाठी रडारवर असल्याचे समजते. या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी फाईलही तयार करण्यात आली होती; परंतु त्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी फाईल घेऊन गेले; परंतु नंतर त्यांचा संपर्कच होत नसल्याने सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी वाट पाहून जिल्हा परिषदेतून निघून गेल्याचे सांगण्यात आले; परंतु बांधकाम विभागातील एक एक धक्कादायक बाबींमुळे लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खिसा भरलेला शिपाई
३१ मार्च दिवशी रात्री बांधकाम विभागाच्या एका शिपायाचा खिसा पैशाने भरलेला होता. कार्तिकेयन यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याची बदली शाहूवाडी तालुक्यात केली आहे. एकाचा खिसा भरला होता आणि आता दुसरा शिपाई नोटा मोजतानाच सापडल्याने बांधकाम विभागातील कारभाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.