पाच कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:19 IST2016-04-04T00:10:51+5:302016-04-04T00:19:48+5:30
इचलकरंजी नगरपालिका : आठजणांना कारणे दाखवा नोटीस

पाच कर्मचारी निलंबित
इचलकरंजी : नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे असलेले पाच कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून गैरहजर असल्याने पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच कामावर उशिरा आल्याबद्दल सात वॉर्ड निरीक्षक व एक स्वच्छता निरीक्षक यांना आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी पहाटे व सकाळी आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार यांनी फिरती केली. त्यावेळी सफाई कामगार करणारे पाच कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून कामावरच आले नसल्याचे निदर्शनास आले.
राजेश तिवडे, दीपक कांबळे, संजय चव्हाण, इस्माईल शेख व गीता सोळंकी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव त्यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी त्यांचे निलंबन करण्याचे निश्चित केले आहे. तसेच आरोग्य निरीक्षक मंगेश दुरूसकर हे कामावर उशिरा आल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, सचिन भुत्ते, तन्वीर आगा, सूर्यकांत वाडकर, श्रीकृष्ण कांबळे, संदीप मधाळे, बबन कांबळे व सचिन भोसले हे वॉर्ड निरीक्षकसुद्धा कामावर उशिरा आले. त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
नगरपालिकेकडून आरोग्य विभागाचे काम सातत्याने सुरू राहण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा होण्याकरिता ही धडक मोहीम एक महिना सतत सुरू राहणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)