कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 22:16 IST2025-06-18T22:09:54+5:302025-06-18T22:16:18+5:30

महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक व निसर्ग लेखक तसेच अनेक पद, पुरस्कारांनी सन्मानित झालेले अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचे आज (१८ जून) निधन झाले.

Who was Maruti Chitampalli Know his life journey and routine | कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या

कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या

अप्पासाहेब पाटील

महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक व निसर्ग लेखक तसेच अनेक पद, पुरस्कारांनी सन्मानित झालेले अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर १९३२ जन्म झाला. सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या चितमपल्ली यांचे प्राथमिक शिक्षण भारतीय चौकातील टी. एम.पोरे विद्यालयात तर महाविद्यलयीन शिक्षण दयानंद कॉलेजात झाले. त्यांनी ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली. या सेवेच्या काळात व निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास ६५ वर्षे त्यांनी जंगल भटकंती केली. 

या साऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रवासातून त्यांनी स्वतःला घडवित-विकसित करीत साहित्याला व जगाला फार मोठी देणगी दिली आहे. त्यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शब्दात वीस पुस्तके लिहून साहित्य समृद्ध केले. विशेष म्हणजे मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या दि ग्रेट माणसाने एक लाख नवीन शब्दाचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी आयुष्यभर वने, वन्यजीव व्यवस्थापन, वन्यप्राणी व पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले. त्यांचे कर्तृत्व हे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे होते. 

त्यांनी मराठीबरोबर संस्कृतचे अध्ययन केले असून जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला होता. या साहित्यसेवा व कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आतापर्यत त्यांनी अनेक साहित्य व अधिवेशनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत. २००६ साली सोलापुरात भरलेल्या ७९व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान चितमपल्ली यांना मिळाला होता. ९३वा वाढदिवस साजरा करताना अरण्यऋषींची प्रकृती अगदी ठणठणीत तरुणाला लाजवेल अशी होती. 

'असा' होता दिनक्रम
शाकाहारी असलेल्या अरण्यऋषींचा दिनक्रम पहाटे ४ वाजता सुरू व्हायचा. व्यायाम व नामस्मरणानंतर ९ वाजता नाष्टा, वृत्तपत्रे व इतर वाचन, दुपारी १  ते २ या दरम्यान भोजन, त्यानंतर ५ वाजेपर्यंत विश्रांती, सायंकाळी ५ ते ७ भेटीसाठी राखीव, रात्री १० वाजता भोजन व झोप लागेपर्यत वाचन. वेळेवर व्यायाम, शाकाहार, फलाहार व निसर्गाचे सानिध्य आदी बाबींचे तंतोतंत पालन हे अरण्यऋषींच्या ठणठणीत प्रकृतीचे रहस्य होते. वयाच्या या टप्प्यावरही ते चष्मा न लावता वाचन करू शकत होते.

Web Title: Who was Maruti Chitampalli Know his life journey and routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.