‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार जगण्याची ऊर्जा वाढवणारा; कोल्हापुरात पार पडला दिमाखदार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 23:30 IST2026-03-28T23:19:03+5:302026-03-28T23:30:52+5:30
पंडित विनोद डिग्रजकर, मंजूषा कुलकर्णी-पाटील यांना दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान

‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार जगण्याची ऊर्जा वाढवणारा; कोल्हापुरात पार पडला दिमाखदार सोहळा
विश्वास पाटील
कोल्हापूर - तुडुंब भरलेल्या रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने पंडित विनोद डिग्रजकर आणि विदुषी मंजूषा कुलकर्णी-पाटील यांना शनिवारी (दि. २८) सायंकाळी ‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय पुरस्काराने येथे सन्मानित करण्यात आले. खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या हस्ते या द्वयींचा सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ‘आनंद भवन’मध्ये झालेल्या या दोन्ही कलाकारांच्या योगदानाचा गौरव होताना रसिकांना टाळ्यांच्या कडकडाटात जणू काही मानवंदनाच दिली. ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार जगण्याची ऊर्जा वाढवणारा असल्याची भावना पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली.
डॉ. विजय दर्डा म्हणाले, कोल्हापूर ही अंबाबाई, जोतिबाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी आणि कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत मोठे काम करून ज्यांनी ठेवले असे आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांची ही भूमी आहे. महिलांसाठी एक सन्मानाचे व्यासपीठ हवे अशी ज्योत्स्ना दर्डा यांची तीव्र इच्छा होती. म्हणूनच त्यांनी ‘सखी मंच’ची स्थापना केली. आज ‘सखी मंच’च्या राज्यभरात साडेतीन लाख महिला सदस्य आहेत. महिलांची शक्ती ओळखली पाहिजे. म्हणूनच संसदेत जेव्हा महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुढे आला तेव्हा त्याला विरोध झाला असतानाही मी मात्र सर्व बहिणींच्या पाठीशी राहिलो. आज सरपंचपदापासून राष्ट्रपतिपदापर्यंत महिला कार्यरत आहेत. उगवत्या कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ‘सूर ज्योत्स्ना’ मंचची स्थापना करण्यात आली आणि गेल्या १३ वर्षात अनेक कलाकारांच्या प्रतिभेला या व्यासपीठाच्या माध्यमातून मोठी संधी मिळाली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार या व्यासपीठावरून घडले आहेत.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, बाळ पाटणकर, आनंद माने, जयेश ओसवाल, विनायक भोसले, राजीव परीख, भरत ओसवाल, शंकर पाटील, वसंतराव मुळीक, अनिल पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, वारणा दूध संघाचे मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्लेकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जयवंत उगले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, विश्वास सुतार, संजय डोईजड, उत्तम फराकटे, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख शिवाजीराव भोसले, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय घोडावत यांची प्रशंसा
डॉ. दर्डा यांनी यावेळी उद्योगपती संजय घोडावत यांचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले, मी उदयपूरहून नागपूरला येताना पहिल्यांदा आणि आज मुंबई कोल्हापूर स्टार एअर लाइन्सने दुसऱ्यांदा प्रवास केला. त्यांच्या श्रेणीतील देशातील कोणतीही एअरलाइन्स इतक्या चांगल्या पद्धतीने खाद्यपदार्थ देत नाही. संजय यांची एक विशेषत: आहे. ती म्हणजे ते जे काही करतात ते स्टाइलने करतात आणि गर्वाने सांगतात की मी कोल्हापूरकर आहे म्हणून तिखट खाणारी, पण गोड माणसं कोल्हापूरकरांची प्रशंसा करताना डॉ. दर्डा म्हणाले, कोल्हापूर म्हणजे लाल माती. तिखट. इतकं तिखट खाऊनही माणसं इतकी गोड राहू शकतात हे मी पहिल्यांदा पाहतोय.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा उल्लेख
डॉ. दर्डा यांनी आपल्या मनोगतामध्ये दिवंगत डॉ. जयसिंगराव पवार यांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, आज मी त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यांनी प्रचंड काम करून ठेवले आहे. जरी ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून ते लोकांच्या नजरेसमोर राहतील.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, खासदार धनंजय महाडिक, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, उद्योगपती संजय घोडावत, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, एस. एस. रिटेल्सचे चेअरमन सिद्धार्थ शाह, ज्युरी गौरी यादवडकर, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख उपस्थित होते.
ज्योत्सना दर्डा यांच्या नावाचा हा मानाचा पुरस्कार माझ्या माहेरीच मला दिला जात आहे. यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अंबाबाईचा आशीर्वाद पाठीशी आहे. ज्या परिसरात मी गाणं गात मोठी झाले, याच ठिकाणी मिळालेला हा पुरस्कार मी गुरु काणेबुवा, पंडित उल्हास कशाळकर यांना समर्पित करते. - मंजूषा कुलकर्णी-पाटील
ज्योत्सना दर्डा राष्ट्रीय पुरस्कार हा जगण्याची ऊर्जा वाढविणारा पुरस्कार आहे. दहाव्या वर्षापासून मी गाणे शिकायला सुरुवात केली. वडील सुधाकरबुवा डिग्रजकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, निवृत्तीबुवा सरनाईक यांनी मला घडवले. माझा उपजीविकेचा व्यवसाय वेगळा आहे. परंतु संगीत ही माझी जिविका आहे.- पंडित विनोद डिग्रजकर