Kolhapur: नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, महादेवी हत्तीणीला गुजरातला पाठवण्याचा निर्णय कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:04 IST2025-07-28T19:03:38+5:302025-07-28T19:04:44+5:30
वनतारा ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबले आहे

Kolhapur: नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, महादेवी हत्तीणीला गुजरातला पाठवण्याचा निर्णय कायम
शिरोळ : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्तीण नांदणी मठातच राहिली पाहिजे. या मागणीसाठी मठाकडून दाखल करण्यात आलेली याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे हत्तीणीला वनतारा केंद्राकडे पाठविण्याचा आदेश कायम राहिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यात हत्तीणीला गुजरात येथे पाठवण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबले आहे. मात्र, हत्तीनीला वनतारा केंद्रात कोणतेही परिस्थितीत देणार नाही ही भूमिका घेत हत्तीण बचावासाठी गाव बंद ठेवत नागरिकांनी मूक मोर्चा काढून विरोध दर्शवला होता.
वाचा : 'महादेवी' हत्तीणसाठी मोर्चा गावात धडकला.. 'वनतारा'साठी गाड्या गावाजवळ थडकल्या
नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मठाकडेच हत्तीण राहण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत मठाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्राकडे पाठवावे लागणार आहे.