Kolhapur: बाळूमामा मंदिरावर रविवारी निघणार घंटानाद मोर्चा, सेवेकरी ग्रुपचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:18 IST2025-11-07T18:17:47+5:302025-11-07T18:18:38+5:30
प्रशासक नेमण्याची मागणी

Kolhapur: बाळूमामा मंदिरावर रविवारी निघणार घंटानाद मोर्चा, सेवेकरी ग्रुपचा पुढाकार
कोल्हापूर : आदमापूर येथील बाळूमामा मंदिरातील भ्रष्ट कारभार व विश्वस्तांच्या वागणुकीविरोधात रविवारी (दि. ९) बाळूमामांचे भक्त व हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या वतीने घंटानाद मोर्चा काढण्यात येणार आहे. मुधाळतिट्टा ते बाळूमामा देवालय असा मोर्चाचा मार्ग असेल, अशी माहिती सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मंदिरावर पुन्हा प्रशासक नेमावा, अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, ट्रस्टमध्ये सुरुवातीपासूनच भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार असून, विश्वस्तांच्या हुकूमशाहीने कारभार चालतो. विश्वस्त स्वत: नियम बनवतात आणि मोडतात. या ट्रस्टमध्ये धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांमुळे वाद चिघळला आहे. यापूर्वी शिवराज नाईकवाडे यांनी प्रशासक म्हणून मंदिराचे कामकाज उत्तम सांभाळले असताना त्यांना बाजूला केले.
त्यानंतर रागिणी खडके यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने विश्वस्त निवडले. त्यांच्याकडूनदेखील बकरी, जमीन खरेदी, दानपेट्या, व्हीआयपी दर्शन अशा विविध विषयांवर गैरकारभार सुरू आहे. त्यांना धर्मादाय कार्यालयाकडून पाठीशी घातले जात आहे. हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. त्यासाठी मंदिरावर पुन्हा प्रशासक नेमण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संजय शेंडे, सागर पाटील, महांतेश नाईक यांच्यासह बाळूमामांचे भक्त उपस्थित होते.