शेतकऱ्यांसाठी खूशखबर! उसाला मिळणार एकरी ५३ हजार रुपये पीककर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:53 IST2022-02-10T13:30:34+5:302022-02-10T13:53:26+5:30
खतांसह मजूर व मशागतीच्या वाढलेल्या किमतीमुळे पीककर्ज वाटपात वाढ

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! उसाला मिळणार एकरी ५३ हजार रुपये पीककर्ज
राजाराम लोंढे
कोल्हापूर : खतांसह मजूर व मशागतीच्या वाढलेल्या किमतीमुळे पीककर्ज वाटपात वाढ करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने वाढीव पीककर्जाचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठविला आहे. उसासाठी एकरी ५२ हजार ८०० रुपये पीककर्ज मिळणार असून, सध्याच्या कर्जापेक्षा सुमारे नऊ हजार एकरी वाढ होणार आहे.
जिल्ह्यात विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले जाते. पीककर्जाशिवाय शेतीपूरक व्यवसायासाठी ‘मध्यम मुदत’ व ‘खावटी’ कर्जही विकास संस्थांच्या माध्यमातून दिले जाते. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी पीककर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने पीककर्ज उचलीचे प्रमाण वाढले आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून २ लाख ९० हजार शेतकरी १८०० कोटी पीककर्ज घेतात. त्याशिवाय ५०० कोटी मध्यम मुदत तर, ४०० कोटी खावटी कर्जाचे वाटप केले जाते.
कोल्हापूूर जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टर एकूण पिकाऊ क्षेत्र आहे. त्यापैकी ३ लाख ९३ हजार हेक्टर खरीप पिकांचे क्षेत्र असून, त्यातील २ लाख हेक्टरवर उसाची लागवड होते. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने पीककर्जाचे वाटपही अधिक होते. सध्या उसासाठी एकरी ४३ हजार २०० रुपये प्रमाण वाटप केले जाते. त्याप्रमाणात खरीप भात व रब्बीसाठी कर्ज वाटप केले जाते.
गेल्या वर्षभरात खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. खताच्या ५० किलो पोत्यामागे ४०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्याचबरोबर मजुरीमध्ये दुप्पट वाढ झाली असून, पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने मशागतीचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. शेती करताना खर्चाचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने पीककर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उसासाठी आता ५२ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. उन्हाळी भातासाठी एकरी २२ हजार ४०० तर, उन्हाळी भुईमुगासाठी १७ हजार ६०० रुपये पीककर्ज मिळणार आहे.
असे मिळणार हेक्टरी पीककर्ज -
पीक एकरी कर्ज
ऊस ५२ हजार ८००
खरीप भात २३ हजार २००
उन्हाळी भात २२ हजार ४००
खरीप ज्वारी ११ हजार ६००
उन्हाळी भुईमूग १७ हजार ६००
सोयाबीन १९ हजार ६००
रब्बी ज्वारी १२ हजार ४००