सीपीआरमधील आगीच्या कारणांचा अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 14:40 IST2020-10-21T14:39:20+5:302020-10-21T14:40:54+5:30
CPR Hospital, fire, kolhapurnews सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला लागलेल्या आगीची चौकशी करणाऱ्या सात सदस्यीय समितीने चौकशी अहवाल तयार केला असून, तो छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के यांच्या कार्यालयाकडे पाठविला आहे.

सीपीआरमधील आगीच्या कारणांचा अहवाल सादर
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला लागलेल्या आगीची चौकशी करणाऱ्या सात सदस्यीय समितीने चौकशी अहवाल तयार केला असून, तो छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के यांच्या कार्यालयाकडे पाठविला आहे.
दि. २८ सप्टेबरच्या पहाटे साडेतीन वाजता सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला अचानक आग लागून उडालेल्या गोंधळात तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता; परंतु तीनही रुग्णांचे मृत्यू आगीमुळे नव्हे तर घटना घडल्यानंतर त्यांना अन्य वॉर्डांत स्थलांतर केल्यानंतर काही वेळाने झाल्याचा खुलासा सीपीआर रुग्णालयाच्या प्रशासनाने केला होता.
आगीची चौकशी करण्याकरिता अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांनी शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. वाय. माळी यांच्या नेतृत्वाखाली सातजणांची समिती नियुक्त केली होती. चौकशीदरम्यान समितीने दोन तज्ज्ञांचे सहकार्य घेतले होते. इलेक्ट्रिकल विभागानेही स्वतंत्रपणे चौकशी करून अहवाल यापूर्वीच अधिष्ठाता यांच्याकडे दिला आहे.
सात सदस्यीय समितीने चौकशी पूर्ण केली असून त्यांचा अहवाल मंगळवारी दुपारी कार्यालयीन टपालातून अधिष्ठाता कार्यालयास पाठविला असल्याचे सांगण्यात आले. ट्रॉमा केअर सेंटरला लागलेली आग हा एक अपघात होता. त्याला कोणी एक व्यक्ती जबाबदार नसून तांत्रिक कारणामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची दाट शक्यता या अहवालात व्यक्त केली असण्याची माहिती मिळाली.
आगीच्या घटनेचा विषय विधानसभेत उपस्थित होण्याची दाट शक्यता असल्यामुळे चौकशी समितीने फार काळजीपूर्वक नोंद करण्यावर लक्ष केंद्रित केले होते, असे सांगण्यात येते.