Kolhapur: दहावीत नापास झाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याने संपवले जीवन, आई-वडिलांना मानसिक धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:44 IST2025-05-15T17:44:18+5:302025-05-15T17:44:51+5:30
गडहिंग्लज : दहावी परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून येथील विद्यार्थ्याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहूल बसाप्पा आयवळे (वय १७, ...

Kolhapur: दहावीत नापास झाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याने संपवले जीवन, आई-वडिलांना मानसिक धक्का
गडहिंग्लज : दहावी परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून येथील विद्यार्थ्याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहूल बसाप्पा आयवळे (वय १७, धबधबा मार्ग, काळभैरी रोड, गडहिंग्लज, मूळ गाव केरूर, ता. चिक्कोडी) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (१४) सकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, राहुल आयवाळे हा येथील एका माध्यमिक शाळेत शिकत होता. दहावीच्या परीक्षेत सहा विषयात नापास झाल्यामुळे तो नाराज झाला होता. काळजी करू नको, पुन्हा परीक्षेला बस, असे आई-वडिलांनी समजावून सांगितले. त्यामुळे रात्री तो जेवून झोपी गेला.
बुधवारी सकाळी सहा वाजता उठल्यानंतर तो घरात नसल्याचे वडिलांच्या लक्षात आले. शौचास गेला असेल, थोड्या वेळत येईल, असे पत्नीने त्यांना सांगितले. परंतु, बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, राहत्या घराच्या बाजूला झाडाच्या फांदीला काळ्या दोरीने त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. बसाप्पा आयवळे यांच्या फिर्यादीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.
आई-वडिलांना धक्का
राहुलचे वडील गवंडीकाम तर आई मोलमजुरी करते. ऑनलाइन निकाल बघितल्यापासून राहुल नाराज झाला होता. शाळेत जाऊन खात्री केली असता तो नापास झाल्याचे समजले. मात्र, कमी शिकलेले असतानाही त्यांनी दहावीतील अपयशाबद्दल राहुलला समजावले होते. तरीदेखील त्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.