Kolhapur: कोडोलीत लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:41 IST2025-06-12T11:40:43+5:302025-06-12T11:41:10+5:30

पळ काढल्याने मोठी बहीण बचावली

Stray dogs attack little girl in Kodoli kolhapur seriously injured | Kolhapur: कोडोलीत लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, गंभीर जखमी

Kolhapur: कोडोलीत लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, गंभीर जखमी

कोडोली : येथील चावडी भाग जवळील दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. आलीजा अरबाज अंबी (वय ४) असे जखमी मुलीचे नाव आहे. आलीजाच्या मोठ्या बहिणीने यावेळी पळ काढल्याने सुदैवाने ती बचावली.

गावचावडी पाठीमागे अंबीवाडा येथे रहात असलेल्या आलीजा आणि मोठी बहीण समायरा या दोघी घरापासून काही अंतरावर असलेल्या दुकानात खाऊ आणण्यासाठी गेल्या होत्या. दुकानात खाऊ घेऊन परत घरी जात असताना, अचानक दोघींवर चार कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी समायरा पळून गेली, तर आलीजा कुत्र्यांच्या तावडीत सापडली. तिनेही कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच शेजारी असलेल्या घरातील लोकांनी कुत्र्यांना पिटाळून तिची सुटका केली. 

तिच्या पायावर, पाठीवर व गळ्याजवळ चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. गेल्या चार दिवसांपूर्वीही याच परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, परंतु प्रसंगावधान राखून हा मुलगा शेजारी असलेल्या घरात गेल्याने बचावला होता.

पडलेला वाडा कुत्र्यांचा तळ

या परिसरात एक जुना पडलेला वाडा असून, त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने, सुमारे २५ ते ३० भटक्या कुत्र्यांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. कोडोलीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने, प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Stray dogs attack little girl in Kodoli kolhapur seriously injured