मिरज - राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर मिरज पूर्व भागातील जानराववाडी (ता. मिरज) येथे अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या दगडफेकीत गाडीची मागील काच फुटली आहे. या घटनेनंतर परिसरात तसेच मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मदार नायकवडी हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज पूर्व ग्रामीण भागात दौऱ्यावर होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता दौरा आटोपून परत येत असताना जानराववाडी ते बेळंकी रस्त्यावर तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दुचाकीवरील दोघा अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.
दगडफेकीत गाडीच्या पाठीमागील बाजूची काच फुटली. हल्ल्यानंतर दुचाकीस्वार पसार झाले. दगडफेकीची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी आमदार नायकवडी यांचे अंगरक्षक तैय्यब जमादार यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.
विचारसरणीचा अडथळा होणाऱ्या प्रवृत्तीचे कृत्यदगडफेकीच्या कृत्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार नायकवडी म्हणाले, माझी राजकीय व सामाजिक वाटचाल रोखता येत नसल्याने व आमच्या विचारसरणीचा अडथळा होत असलेल्या प्रवृत्तींनी हे कृत्य केले असावे.