कोल्हापुरातील शाहूपुरीतून स्टेरॉईडची इंजेक्शन्स जप्त, विक्री थांबविण्याचे आदेश; अग्निवीर सैन्यभरतीत तरुणांनी केला होता वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:24 IST2022-12-15T13:08:23+5:302022-12-15T13:24:23+5:30
स्टेरॉईडची बेकायदेशीर विक्री केल्याबद्दल संबंधित वितरकावर आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जाणार

संग्रहीत फोटो
कोल्हापूर : स्टेरॉईड इंजेक्शन्सची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या वितरकाचा शोध लावण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यश आले असून, शाहूपुरीतील वितरकाच्या गोदामातील स्टेरॉईडची इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंजेक्शनची विक्री केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित वितरकाला औषधांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
कोल्हापुरात झालेल्या अग्निवीर सैन्यभरतीदरम्यान तरुणांकडून स्टेरॉईडच्या इंजेक्शन्सचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेऊन पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने स्टेरॉईड विक्रीच्या रॅकेटचा शोध सुरू केला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अश्विन ठाकरे यांच्या पथकाने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात भरती स्थळावरून स्टेरॉईडच्या रिकाम्या इंजेक्शन जप्त केल्या होत्या. त्या इंजेक्शन्सवरील बॅच नंबरवरून अधिकारी वितरकापर्यंत पोहोचले. शाहूपुरीतील वितरकाकडून स्टेरॉईडचे इंजेक्शन विक्री झाल्याचे निष्पन्न होताच, पथकाने मंगळवारी (दि. १३) वितरकाच्या गोदामावर छापा टाकून कारवाई केली.
संबंधित वितरकाने त्याच्याकडील १२ इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली. गोदामातील १८ इंजेक्शन्स पथकाने जप्त केली.
गुन्हा दाखल होणार
स्टेरॉईडची बेकायदेशीर विक्री केल्याबद्दल संबंधित वितरकावर आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तपास पूर्ण होताच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.