महाराष्ट्र सदनमधील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे लोकवर्गणीतून बदलू; इंडिया आघाडीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:00 IST2026-03-13T12:59:36+5:302026-03-13T13:00:11+5:30
आघाडीच्यावतीने शाहू समाधीस्थळी निदर्शने

महाराष्ट्र सदनमधील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे लोकवर्गणीतून बदलू; इंडिया आघाडीचा इशारा
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील पुतळे महायुती सरकारला बदलणे शक्य नसेल तर आम्ही राज्यातून लोकवर्गणी गोळा करून हे पुतळे बदलू, असा इशारा इंडिया आघाडीच्या वतीने गुरुवारी येथे देण्यात आला. हे पुतळे बदलण्यासाठी आघाडीच्या वतीने दुपारी शाहू समाधीस्थळी निदर्शने करण्यात आली.
यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पुतळे बदलण्याबाबत हालचाली न झाल्याने पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इंडिया आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळी एकत्र येत या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवला. ‘महाराष्ट्र सरकार होश मे आओ’, ‘बदला, बदला, दिल्लीतील पुतळे बदला’ अशा घोषणा दिल्या.
उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. सरकार पुन्हा सत्तेवर आले तरीही या पुतळ्यांबाबत निर्णय झाला नाही. दिल्लीतील या दोन्ही महापुरुषांचे पुतळे पाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाची दिवाळखोरी लक्षात येते. जर सत्तारूढ नेते जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष करणार असतील तर कोल्हापुरातून मोठे जनआंदोलन उभे करू, आणि लोकवर्गणीतून दिल्लीतील हे पुतळे बदलू.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, आर. के. पोवार, रियाज कादरी, विशाल देवकुळे, सुभाष देसाई, रवी जाधव, भरत रसाळे, दिलीप पोवार, राजू जाधव, राजेश वरक, शंकररराव काठाडे, शुभम शिरहट्टी, अनिल लवेकर, गोविंद वाघमारे, वासिम मोमीन, अशोक पोवार, अनिल घाटगे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
आंदोलनस्थळी निदर्शकांनी शाहू महाराजांचा पुतळा आणि यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा आणली होती. यावेळी चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना उपस्थित सर्वांनी अभिवादनही केले. ज्या या दोन्ही महापुरुषांनी महाराष्ट्राला दिशा दिली त्यांच्याच बाबतीत देशाच्या राजधानीतील पुतळे बदलण्याबाबत सरकार गंभीर नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.