डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊंचे पुतळे रात्रीत उभारले, कोल्हापुरातील राजेंद्रनगरात तणाव

By उद्धव गोडसे | Updated: April 5, 2025 11:25 IST2025-04-05T11:25:15+5:302025-04-05T11:25:15+5:30

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेजवळ मुख्य चौकात काही तरुणांनी रात्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ ...

Statues of Dr Babasaheb Ambedkar, Lokshahir Annabhau erected at night, tension in Rajendranagar Kolhapur | डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊंचे पुतळे रात्रीत उभारले, कोल्हापुरातील राजेंद्रनगरात तणाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊंचे पुतळे रात्रीत उभारले, कोल्हापुरातील राजेंद्रनगरात तणाव

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेजवळ मुख्य चौकात काही तरुणांनी रात्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभे केले. शनिवारी (दि. ५) सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुतळे हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

राजेंद्रनगर चौकात सतीश आनंदराव घोरपडे यांची साडेपाच एकर जागा आहे. रिकाम्या जागेत झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण केले असून, रस्त्याकडेची जागा रिकामी आहे. याच जागेत अज्ञातांनी पहाटे दोन चबुतरे बांधले. सकाळी सातच्या सुमारास त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभे केले. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही परवानगी न घेता खासगी जागेत उभे केलेले पुतळे तातडीने काढून घेण्याची विनंती पोलिसांनी स्थानिकांना केली. मात्र, पुतळे न हटवण्यावर स्थानिक ठाम आहेत. 

पोलिसांच्या कारवाईला विरोध करण्यासाठी परिसरातील महिलांनी चौकात ठाण मांडले आहे. तरुणांनीही मोठी गर्दी केली असून, पोलिसांसह महापालिकेचे अधिकारी स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सुशांत चव्हाण, श्रीराम कणेरकर यांच्यासह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपायुक्त राहुल रोकडे स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. पुतळे हटवण्यावर पोलिस ठाम आहेत, तर पुतळ्यांना हात लावू देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्याने परिसरात तणाव वाढला आहे.

Web Title: Statues of Dr Babasaheb Ambedkar, Lokshahir Annabhau erected at night, tension in Rajendranagar Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.