कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात गुरुवारी रणशिंग फुंकले जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 10:18 IST2025-02-15T10:18:29+5:302025-02-15T10:18:59+5:30

बाराही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची होणार राज्यव्यापी बैठक, सतेज पाटील यांची माहिती

statewide meeting of farmers from all 12 districts will be held on feb 20 against nagpur goa shaktipeeth highway in kolhapur | कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात गुरुवारी रणशिंग फुंकले जाणार!

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात गुरुवारी रणशिंग फुंकले जाणार!

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गबाधित बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक गुरुवारी (दि. २०) कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित केल्याची माहिती विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शुक्रवारी (दि.१४) प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्यानंतर गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार केले आहेत. या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध असे सांगितले गेले. मात्र, १२ पैकी दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी फेब्रुवारी २०२४ पासून आंदोलन करत आहेत. याला उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी २४ जानेवारीला राज्यव्यापी धरणे आंदोलनही केले.

शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे, पर्यावरणाचे, करदात्यांचे, जनतेचे सर्वांचेच नुकसान होणार आहे. पर्यायी महामार्ग असताना त्याचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्यातील एकजूट घडवत आरपारची लढाई करायचे ठरवले आहे. 

यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीमध्ये २० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता राज्यव्यापी बैठक घेऊन तेथून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या व्यापक बैठकीला कोल्हापूरसहित बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील व गिरीश फोंडे यांनी केले.

शक्तिपीठसाठी राज्य सरकारकडून पुढाकार : आबिटकर
शक्तिपीठ महामार्गासंबंधी मतमतांतरे असणे साहजिक आहे. राज्य सरकारकडून महामार्ग करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. मात्र हा महामार्ग ज्या मतदारसंघांतून जाणार आहे, तेथील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात वस्तुस्थिती आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Web Title: statewide meeting of farmers from all 12 districts will be held on feb 20 against nagpur goa shaktipeeth highway in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.