सासुरवास नको गं बाई.. त्रासाने जीव दमला गं बाई; कोल्हापुरात राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत महिलांची कैफियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:27 IST2024-12-21T13:27:11+5:302024-12-21T13:27:52+5:30

कोल्हापूर : पती-पत्नी आयटीत कामाला, एकमेकांवर जीवापाड प्रेम.. पण मुलाचे आई-वडील लग्न मोडण्यासाठी टपून बसलेत, पालकांच्याच विरोधात मुलावर तक्रारीची ...

State Women's Commission public hearing in Kolhapur women's mood | सासुरवास नको गं बाई.. त्रासाने जीव दमला गं बाई; कोल्हापुरात राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत महिलांची कैफियत

सासुरवास नको गं बाई.. त्रासाने जीव दमला गं बाई; कोल्हापुरात राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत महिलांची कैफियत

कोल्हापूर : पती-पत्नी आयटीत कामाला, एकमेकांवर जीवापाड प्रेम.. पण मुलाचे आई-वडील लग्न मोडण्यासाठी टपून बसलेत, पालकांच्याच विरोधात मुलावर तक्रारीची वेळ, बाहेरख्याली पती नांदवायला तयार नाही, मला फक्त मुलं हवी आहेत, गेली १५ वर्षे मी नवऱ्याचा छळ सहन केला आता माझी, मुलांची त्याच्यापासून सुटका करून द्या, दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या उच्चपदस्थ तरुणीवर सासरच्यांविरोधात तक्रार करण्याची वेळ आली, मी लव्ह मॅरेज करून फसले, आता नांदायचे नाही, मी माझे करिअर करेन.. या कैफियती आणि दाहक वास्तव आहे राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीतील. हे ऐकताना राग, दुख, वेदना, सहनशिलता, संयम, लढा, संघर्ष, तळतळ, कणखरपणा अशा भावनांचा कल्लोळ डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या आसवांमधून व्यक्त हाेत होता.

प्रत्येक महिला पती, सासू, सासरे, सासरची मंडळी यांच्याकडून कधी नीट वागत नाही म्हणून, कधी संपत्तीसाठी, कधी मुलांच्या ताब्यासाठी, स्वत:च्या आत्मसन्मानासाठी, करीअरसाठी, व्यसनी पतीच्या त्रासापासून मोकळं होण्यासाठी, पतीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून, पुरुषप्रधान संस्कृतीच्या उंबऱ्याची चौकट मोडण्यासाठी, त्या धुसमटीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. प्रत्येकीची कहाणी वेगळी पण सोसत असलेल्या चटक्यांची जाणीव मात्र समान. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झालेल्या जनसुनावणीतील हे चित्र होते.

सकाळी दहा वाजल्यापासून महिला येथे न्यायाच्या अपेक्षेने आल्या होत्या. त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी शासकीय अधिकारी, स्वयंसेवक, समुपदेशक, वकील व पोलीसांचे असे चार पॅनेल बनवले होते. प्रत्येक पॅनेलसमोर महिला तिची व्यथा सांगत होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या जनसुनावणीत काही प्रकरणात तडजोडी झाल्या, काही प्रकरणे भरोसा सेलकडे वर्ग केले गेले. काही प्रकरणात नोटीस तर काही प्रकरणात थेट गुन्हे नोंदवण्याच्या सूचना चाकणकर यांनी केल्या.

महिलेला भोवळ, पुरुषाला फीट

आपली तक्रार नोंदवताना एका ग्रामीण भागातून आलेल्या महिलेला भोवळ आली, पाच दहा मिनिटांनी त्या शुद्धीत आल्या. तर बाहेर नोंदणी टेबलवर खेबवडे येथून आलेल्या एका पुरुषाला फिट आली. शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने या दोघांसाठी रुग्णवाहिका मागवली.

२० प्रकरणात समझोता

गेल्या काही महिन्यांपासून समुपदेशात असलेल्या २० प्रकरणांमध्ये यावेळी तडजोड झाली. जिल्हा प्रशासनाने या जोडप्यांना एकमेकांना गुलाबाचे फूल द्यायला लावले तसेच त्यांचा सत्कार केला.

उच्चशिक्षित तरुणीही कचाट्यात

उच्चभ्रू कुटुंब, उच्चशिक्षित, आणि मोठ्या पगारावर, पदावर काम करणाऱ्या २०-२५ वर्षाच्या तरुणीही सासुरवासाच्या कचाट्यात आल्याचे शुक्रवारी जाणवले. नवऱ्याची साथ आहे पण सासरच्या मंडळींचा जाच आहे, वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केले आता प्रेमाची वीण उसवली, सततच्या टोमण्यांनी, सीसीटीव्हीसारख्या बोचक नजरा नकोशा झाल्या अशा तक्रारी घेऊन तरुणी आल्या होत्या.

Web Title: State Women's Commission public hearing in Kolhapur women's mood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.