कोल्हापूर ते अयोध्या, कटियार गाड्या सुरु करा, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:29 IST2025-12-19T16:28:56+5:302025-12-19T16:29:19+5:30
सह्याद्रीचा ‘ट्रेन ऑन डिमांड’ दर्जा कमी करा

कोल्हापूर ते अयोध्या, कटियार गाड्या सुरु करा, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर ते अयोध्या तसेच कोल्हापूर ते कटियार या नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी गुरुवारी पुण्यात झालेल्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा अध्यक्ष होते.
या बैठकीत पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती तसेच मुंबई झोन सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूर आणि सांगली दरम्यान रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. कोल्हापूर येथे नव्याने सुरू झालेल्या उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विशेष मुद्दे उपस्थित करण्यात आले.
सातारा आणि सोलापूर मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे उच्च न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना सकाळी आपल्या जिल्ह्यातून निघून संध्याकाळी परत घरी जाणे शक्य होणार असून न्यायालयाच्या वाढत्या गरजांची पूर्तता होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले.
सह्याद्रीचा ‘ट्रेन ऑन डिमांड’ दर्जा कमी करा
कोल्हापूर–पुणे विद्युतीकरण तसेच मिरज–पुणे दुहेरीकरण पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील सर्व गाड्यांचा प्रवासकाल कमी व्हावा, कोल्हापूर–पुणे मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पुढे नेण्याची तसेच तिचा ‘ट्रेन ऑन डिमांड’ दर्जा कमी करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना जादा तिकीट दरांपासून दिलासा मिळणार आहे.
पादचारी पुलाची मागणी
रेल्वे स्थानकातून ये–जा करणाऱ्या प्रवाशांना एसटी स्टँड व राजारामपुरीकडे जाण्यासाठी पादचारी पुलाची तसेच अमृत भारत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या पादचारी पुलाच्या कामाबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यावर भर देण्यात आला.
छत्रपती राजर्षी शाहू टर्मिनस येथे अमृत भारत योजनेंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्णतः उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. –शिवनाथ बियाणी, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती पुणे.