Kolhapur: अमावास्येच्या दिवशी आदमापूरला लाखो भाविकांची मांदियाळी, एस.टी.ने वर्षभरात किती कोटी कमावले..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:33 IST2025-12-29T12:26:09+5:302025-12-29T12:33:31+5:30
अमावास्या यात्रेबरोबर दर रविवारी देखील आदमापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे

Kolhapur: अमावास्येच्या दिवशी आदमापूरला लाखो भाविकांची मांदियाळी, एस.टी.ने वर्षभरात किती कोटी कमावले..वाचा
बाजीराव जठार
वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत सद्गुरू बाळूमामा यांच्या दर्शनासाठी २०२५ या वर्षात १२ अमावास्या यात्रेतून एसटी महामंडळाने ३ लाख २८ हजार भाविकांना सुरक्षित सेवा पुरवली आहे. त्या माध्यमातून महामंडळाने तब्बल १ कोटी ९० लाख ६६ हजारांचे उत्पन्न मिळविले आहे.
आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यासह अन्य राज्यांतील भाविक-भक्त मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. अमावास्येच्या दिवशी तर आदमापूरला लाखो भाविकांची मांदियाळी असते. सन २०२५ या वर्षातील जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत झालेल्या अमावास्या यात्रेत एसटीने तब्बल ३ लाख २८ हजार १६२ भाविकांची सुरक्षित वाहतूक केली. या सेवेसाठी कोल्हापूर विभागाने वर्षभरात ४७० बसेसच्या माध्यमातून ५ हजार ९४८ फेऱ्या राबविल्या आणि २ लाख ७० हजार ५६९ किलोमीटरचा सुरक्षित प्रवास पूर्ण केला.
त्यातून एसटीला सुमारे १ कोटी ९० लाख ६६ हजारांचे उत्पन्न मिळाले. शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे प्रति किलोमीटर सरासरी ७० रुपयांचे उत्पन्न साध्य झाले आहे. प्रत्येक अमावास्येला भरणाऱ्या या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिण कर्नाटकातूनही भाविक आदमापूर येथे दाखल होतात.
अमावास्या यात्रेबरोबर दर रविवारी देखील आदमापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यात महामंडळाकडून आदमापूरसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून अधिक बसेस, भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा आणि नियोजनबद्ध वेळापत्रकाची गरज असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.