SSC Result 2023: विषयच हार्ड! पास होणार नाहीस म्हणून चिडवणाऱ्या मित्रांनीच काढली उंटावरून मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 19:30 IST2023-06-02T19:29:34+5:302023-06-02T19:30:05+5:30
मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SSC Result 2023: विषयच हार्ड! पास होणार नाहीस म्हणून चिडवणाऱ्या मित्रांनीच काढली उंटावरून मिरवणूक
कोल्हापूर : काहीतरी हटके करण्यात कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात. असाच काहीशा प्रसंग आज पुन्हा अनुभवायला आला. हौसेला अन् जल्लोषामध्ये तर कोल्हापूरकरांचा नादच खुळा असतो. आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला अन् मित्र पास झाला म्हणून मित्रांनीच त्याची थेट उंटावरुनच मिरवणूक काढली. याच मित्रांनी त्याला पास होणार नाही म्हणून चिडवले होते. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
समर्थ सागर जाधव असे या उंटावरुनच मिरवणूक काढण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समर्थने एस एम लोहिया हायस्कुलमधून दहावीची परीक्षा दिली होती. तो पासच होणार नाही म्हणून त्याला मित्र वर्षभर चिडवत होते. मात्र आज, दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला अन् समर्थ 51 टक्के गुण मिळवत पास झाला. यानंतर मात्र ''भावा, पास झालास!'' असे म्हणत मित्रांनी समर्थची थेट उंटावरूनच मिरवणूक काढत आपल्या मित्र प्रेमाचा दाखला दाखवून दिला. कोल्हापुरातील गंगावेश परिसरात तासभर ही मिरवणूक सुरु होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. निकालात यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. तर, कोल्हापूरचा निकाल ९६.२२% लागला असून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.