क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले विधेयक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:13 IST2025-12-10T12:12:08+5:302025-12-10T12:13:56+5:30
शाळेमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर

क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले विधेयक
कोल्हापूर: देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य करण्याचे विधेयक संसदेत सोमवारी मंजूर करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले होते.
देशातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला समान क्रिडा हक्क मिळावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासह सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास व्हावा, यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षण अनिवार्य करावे, हे विधेयक मंजूर करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी मांडलेल्या या विधेयकानुसार देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अत्यावश्यक असणार आहे.
त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाईल. मैदान, खेळाची साधने, प्रशिक्षक आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणारे हे विधेयक आहे. हे विधेयक लागू झाल्यानंतर, देशभरातून अनेक खेळाडू घडतील आणि क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा जागतिक पातळीवर वाढेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.