कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागाने सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारा स्पंज शोधून काढला आहे. विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी शुभम सुतार यांनी हे संशोधन केले.
औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने हे संशोधन करताना ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ या नव्या सिद्धांताची तसेच ‘शुभज्योत इक्वेशन’ या नव्या समीकरणाची भर पडली आहे.
या संशोधनाची विश्लेषण प्रक्रिया ही विद्यापीठाच्याच जैवतंत्रज्ञान अधिविभागासह विविध अधिविभाग आणि मध्यवर्ती सुविधा केंद्र येथे उपलब्ध शास्त्रीय उपकरणांवर करण्यात आली. - डॉ. ज्योती जाधव, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठ
पोअर कॉन्फ्लेशनचा सिद्धांत उच्च तापमानात बायोचारची शोषण क्षमता कशी वाढते, हे संशोधकांनी यात स्पष्ट केले. तापमानवाढीमुळे बायोचारमध्ये संरचनात्मक बदल होतात. त्याचा पृष्ठभाग आणि अंतर्गत क्षेत्र वाढते. यामुळे अंतिमतः त्याची सच्छिद्रता वाढून त्याच्या शोषण क्षमतेतही वाढ होते, असे हा सिद्धांत सांगतो.
‘बायोचार’ हा सांडपाण्यातून रंग-प्रदूषके शोषून घेतो निसर्गातील विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून ‘बायोचार’ हा सांडपाण्यातून रंग-प्रदूषके शोषून घेणारा स्पंजसारखा सच्छिद्र पदार्थ निर्माण करणे आणि त्याची शोषण क्षमता वाढवत जाऊन संबंधित सांडपाण्याचे जास्तीत जास्त शुद्धीकरण करणे, अशी या संशोधनाची दिशा आहे.याबाबतचा शोधनिबंध ‘स्प्रिंजर नेचर’ या आघाडीच्या नामांकित शोधपत्रिका समुहाच्या ‘बायोचार’ शोधपत्रिकेत विनामूल्य छापून आला आहे.