विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात

By राजाराम लोंढे | Published: July 4, 2023 01:26 PM2023-07-04T13:26:56+5:302023-07-04T13:27:21+5:30

बहुतांशी ‘राष्ट्रवादी’ हसन मुश्रीफ यांच्यासोबतच, स्थानिक अडचणीमुळे काहींची कोंडी

Split in NCP, Leaders of NCP in Kolhapur district are confused | विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात

googlenewsNext

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : तालुक्यातील स्थानिक अडचणीमुळे माजी आमदार के. पी. पाटील, राजीव आवळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड यांच्यासह काहीजणांची भूमिका अद्याप तळ्यातमळ्यात दिसत आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये संमभ्रवस्था असली तरी जिल्ह्यातील बहुतांशी राष्ट्रवादीमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतच राहण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील कोण कोणासोबत जाणार याविषयी उत्सुकता असून, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी उघड भूमिका घेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर के. पी. पाटील यांच्यासह काहीजणांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते मंत्री मुश्रीफ यांच्यासोबतच राहण्याची शक्यता आहे.

या नेत्यांचे तळ्यात मळ्यात

के. पी. पाटील : भाजप, शिवसेना (शिंदेगट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे जायचे म्हटले तर आगामी विधानसभेची अडचण आहे. येथून त्यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे प्रकाश आबीटकर हे विद्यमान आमदार आहेत. यासाठी ४० वर्षांची मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतची मैत्री तोडायची का? मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेतली तर ‘बिद्री’हातातून जाऊ शकते, याची भीतीही के. पी. पाटील यांना आहे.

मानसिंगराव गायकवाड : शाहूवाडीमध्ये मानसिंगराव गायकवाड यांची माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्याशी युती आहे. येथे आमदार विनय काेरे हे त्यांचे विरोधक आहेत, नवीन समीकरणात त्यांना कोरे सोबत जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची कोंडी झाली असून, अद्याप त्यांची तळ्यातमळ्यात भूमिका आहे.

बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर : जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचे आमदार विनय काेरे हे विरोधक आहेत, नवीन समीकरणासोबत जायचे म्हटले तर त्यांचीही अडचण आहे.

अशोकराव जांभळे : माजी आमदार अशोकराव जांभळे (इचलकरंजी) व मदन कारंडे हे मंत्री मुश्रीफ यांचे जवळचे मानले जातात. मात्र, त्यांच्यासोबत जाणे म्हणजे पारंपरिक विरोधक भाजप व प्रकाश आवाडे यांच्यासोबत जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप पत्ते खोललेले नाहीत.

पदाधिकाऱ्यांचे वेट ॲन्ड वॉच

करवीर, गगनबावडा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा गोंधळ पहावयास मिळत आहे. नेमकी काय भूमिका घ्यायची? याविषयी संभ्रमावस्था असून, सध्या त्यांनी वेट ॲन्ड वॉच अशीच भूमिका घेतली आहे.

काहीजण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर..

प्रसार माध्यमांनी विचारले तर काय सांगायचे? म्हणून काहीजण फोन उचलत नाहीतर काहीजण गेल्या दोन दिवसापासून संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहेत.

नेत्यांची भूमिका अशी राहील..

शरद पवार :
व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, संध्यादेवी कुपेकर, मुकुंद देसाई.            
अजित पवार : हसन मुश्रीफ, राजेश पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, वसंतराव धुरे, राजेश लाटकर.
तळ्यातमळ्यात : मानसिंगराव गायकवाड, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अशोकराव जांभळे, मदन कारंडे, राजीव आवळे.

Web Title: Split in NCP, Leaders of NCP in Kolhapur district are confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.