कोल्हापुरात चार ठिकाणी होणार घनकचरा वर्गीकरण, संकलन केंद्र; ११ कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:52 IST2026-03-27T16:50:50+5:302026-03-27T16:52:33+5:30

कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही

Solid waste classification and collection centers to be set up at four locations in Kolhapur | कोल्हापुरात चार ठिकाणी होणार घनकचरा वर्गीकरण, संकलन केंद्र; ११ कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

कोल्हापुरात चार ठिकाणी होणार घनकचरा वर्गीकरण, संकलन केंद्र; ११ कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे विकेंद्रीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात चार ठिकाणी ११ कोटी ११ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीतून चार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. नगरविकास विभागाने याचा अध्यादेश गुरुवारी काढला आहे.

त्यामुळे शहरातील वाढत्या कचऱ्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकार व महापालिका निधीचा हिस्सा देणार आहे. कोल्हापूर शहरातील पुईखडी, नदीकाठ, राजारामपुरी परिसर व उपनगर अशा चार ठिकाणी छोटछोटे प्रकल्प उभारण्यात येतील.

कोल्हापूर शहरात रोज २७५ टन कचरा जमा होतो. हा कचरा कसबा बावड्यातील झूम प्रकल्पावर नेऊन टाकला जातो. तेथे या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून झूम प्रकल्पावरील कचरा व्यवस्थापन प्रकल्पही बंद असल्याने येथे कचऱ्याचे ढीगच्या ढीग साठले आहेत. कचरा टाकण्यासाठी येथे जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे वाढत्या कचऱ्यावर व्यवस्थापन करण्यासाठी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने पाठवला होता.

त्यानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान-२ अंतर्गत कोल्हापूर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प प्रस्तावास नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समितीने ३० जानेवारीला मान्यता दिली होती. त्यानुसार याचा अध्यादेश गुरुवारी काढण्यात आला.

कोण किती निधी देणार

  • मूळ प्रकल्पांसाठी खर्च : ११ कोटी ११ लाख ९९ हजार ५३ रुपये
  • केंद्र सरकारचा हिस्सा : ३ कोटी ६६ लाख, ९५ हजार ६८८ रुपये
  • राज्य सरकारचा हिस्सा : ४ कोटी ११ लाख ४३ हजार ६४९ रुपये
  • महापालिकेचा हिस्सा : ३ कोटी ३३ लाख ५९ हजार ७१६ रुपये


आता जागांचा शोध आव्हानात्मक

बावड्यातील झूम प्रकल्पाची जागा कमी पडत असल्याने आणखी एक मोठा प्रकल्प गरजेचा होता. मात्र, महापालिका जेथे जागा बघेल तेथे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांचा विरोध होत असल्याने महापालिका चार ठिकाणी छोटेछोटे प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी परिसरांची निवड केली असली तरी जागा मात्र अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. या जागांची निवड करणे महापालिकेपुढे आव्हान असेल.

Web Title : कोल्हापुर में 11 करोड़ रुपये की लागत से चार ठोस अपशिष्ट प्रबंधन केंद्र

Web Summary : कोल्हापुर में कचरा प्रबंधन के लिए 11 करोड़ रुपये की लागत से चार ठोस अपशिष्ट प्रबंधन केंद्र स्थापित किए जाएंगे। इस परियोजना का उद्देश्य केंद्र, राज्य और नगरपालिका निधि के योगदान से शहर की बढ़ती कचरा समस्या का समाधान करना है। स्थान का चयन अभी भी एक चुनौती है।

Web Title : Kolhapur to Get Four Solid Waste Management Centers with ₹11 Crore Funding

Web Summary : Kolhapur will establish four solid waste management centers with ₹11 crore funding to decentralize waste processing. The project aims to solve the city's increasing waste problem with contributions from central, state, and municipal funds. Location selection remains a challenge.