Kolhapur Politics: मग आता पतूर कुठं हुतास...; मुरगूडमधील 'ते' फलक ठरले चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:41 IST2025-11-01T13:40:25+5:302025-11-01T13:41:59+5:30
अनोख्या फलकाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले

Kolhapur Politics: मग आता पतूर कुठं हुतास...; मुरगूडमधील 'ते' फलक ठरले चर्चेचा विषय
अनिल पाटील
मुरगूड : नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांकडून तसेच नेते मंडळीकडून बैठका, भेटीगाठी, तसेच आश्वासनांचा वर्षाव सुरू झाला आहे. दरम्यान, सुजाण नागरिकांनी शहरातील सात ते आठ प्रमुख चौकात लावलेल्या एका अनोख्या फलकाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फलकावर मोठ्या अक्षरांत लिहिले आहे –काय पाहिजे सांगा? “मी तुमचं काम करतो,पोरग्याला नोकरीला लावतो, सुनेची शाळेत ऑर्डर काढतो, बँकेत कामाला लावतो, कारखान्यात ऑर्डर काढतो... मग आता पतूर कुठं होतास?” अशा टोचून बोलणाऱ्या शैलीत हा प्रश्न विचारण्यात आला आहे. सदरचे फलक एस टी स्टॅन्ड, गणेश मंदिर, मुख्य रोड, हनुमान मंदिर, अंबाबाई मंदिर आदी ठिकाणी मध्यरात्री अज्ञातानी लावले आहे. लाल रंगातील हे फलक लक्ष वेधून घेत आहेत.
“सुजाण मुरगूडकर” या नावाने ते लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर या फलकाचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामुळे मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी या उपरोधिक फलकाने वातावरणात वेगळीच रंगत आणली आहे.