कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे २४ रुग्ण, सहाजणांची नोंद नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:06 IST2025-06-09T17:05:52+5:302025-06-09T17:06:25+5:30
‘लोकमत’च्या वृत्तानंतर आकडेवारी समाविष्ट

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे २४ रुग्ण, सहाजणांची नोंद नाही
कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे २४ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान यातील सहा रुग्ण हे सीपीआरसह अन्य ठिकाणी उपचार घेत असताना त्यांची नोंदच करण्यात आली नव्हती. रविवारी ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
१४ मे २०२५ रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण नोंदवण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत २४ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. ९ जणांची तब्येत बरी झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून १३ रुग्ण सक्रिय आहेत. या एकूण रुग्णांमधील तीन रुग्ण अन्य जिल्ह्यातील आणि राज्यातील आहेत. तर ७ ग्रामीण आणि १४ कोल्हापूर महापालिका आणि नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील आहेत.
सध्याची कोरोनाची लक्षणे ही सौम्य असून तरीही वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. ज्यांना आधीच रक्तदाब, मधुमेह किंवा अन्य जुने आजार आहेत त्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.