Crime News: औषधसाठा असल्याचे भासवून मद्याची तस्करी, कोल्हापुरात कंटेनरसह ४५ लाखांचा मद्यसाठा जप्त
By तानाजी पोवार | Updated: July 25, 2022 16:24 IST2022-07-25T16:09:47+5:302022-07-25T16:24:49+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Crime News: औषधसाठा असल्याचे भासवून मद्याची तस्करी, कोल्हापुरात कंटेनरसह ४५ लाखांचा मद्यसाठा जप्त
कोल्हापूर : औषध साठा असल्याचे भासवून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राष्ट्रीय महामार्गावर गांधीनगर फाट्याजवळ पकडला. कारवाईत कंटेनरसह मद्य असा सुमारे ४४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.
याप्रकरणी वाहनचालक अनिल भाऊसाहेब कदम (वय ३३ रा. जालना रोड, बीड, ता. गोवराई, जि. बीड) याला ताब्यात घेऊन त्याच्यावर दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
उचगाव हद्दीतून बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी कंटेनरमधून होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे व उपअधीक्षक राजाराम खोत यांना मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर गांधीनगर फाटा येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद कंटेनरला थांबवून पथकाने चौकशी केली. चालकाने कंटेनरमध्ये औषधसाठा असल्याचे सांगितले. मात्र अधिक तपासणी केली असता कंटेनरमध्ये गोवा बनावटीचा मद्यासाठा आढळून आला. यावेळी सुमारे ४४ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई हातकणंगले निरीक्षक संभाजी बरगे, कागल सीमा तपासणी नाकाचे निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक बबन पाटील, शीतल शिंदे, सहायक निरीक्षक आनंद वाघमारे, जवान सचिन लोंढे, अनिल दांगट, बालाजी गिड्डे, राहुल संकपाळ, योगेश शेलार यांनी केली.