पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या १२ बसेस राधानगरीत अडकल्या, दीडशे प्रवासी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:39 IST2019-08-06T16:38:38+5:302019-08-06T16:39:25+5:30
पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत.

पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या १२ बसेस राधानगरीत अडकल्या, दीडशे प्रवासी संकटात
कोल्हापूर - पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढत आहे. दरम्यान राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर बस पाण्यात अडकली असून त्यातील तीस प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पुणे येथून सुमारे दिडशे प्रवाशांना घेऊन बारा बसेस गोव्यात येत होत्या. काल (५ ऑगस्ट) सोमवार मध्यरात्री अडीच वाजता या बसेस कोल्हापूर येथे दाखल झाल्या. कोल्हापूरात पोहोचल्यानंतर पुढील महामार्गावर पुराचे पाणी आल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरहुन गोव्यात येण्यासाठी मॅपचा आधार घेत गारगोटी, देवगड हा अंतर्गत रस्ता धरला. या रस्यावर पूर्वीपासून पाणी आले होते. याची माहिती बस चालकांना नसल्याने त्यांनी बसेस तशाच पुढे नेल्या. राधानगरी येथे पोहोचताच त्यांना येथील सर्व गाव पाण्याखाली गेल्याचे समजले. सर्व बसेस मागे नेण्याचा प्रयत्न केला असता मागील भाग सुद्धा पाण्यात बुडल्याचे त्यांना आढळून आले.
दरम्यान बसच्या चालकाने निष्काळजी पणा दाखवत बस तशीच पुढे नेल्यामूळे सदर बस राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर पाण्यात अडकली. धोक्याचा इशारा दिलेला असतांना बस पूढे नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घेतल्यामुळे संतापलेल्या लोकांनी बस चालकाला बेदम चोप दिल्याचे समजते.
पोलिटिकल सायन्सच्या गोव्यातील शिक्षिका संस्कृती आईर यांनी सकाळी दहाच्या दरम्यान आपात्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जवळच्या गावातील सर्व लोकांना बचाव पथकाच्या मदतीने दुसऱ्या जागी हलवले आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कोणीच उपस्थित नाही.पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आल्या नंतर इतरांना मदत केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे आईर यानी सांगितले. अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये वृद्ध,महिला आणि मुलांचा सुद्धा समावेश आहे. त्यांना कालपासून काहीच खायला मिळालेले नाही. पाण्याचा स्तर वाढत चालल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे