Kolhapur: दहावी चांगल्या गुणाने पास झाला, पण ते पहायला 'तो' नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 18:38 IST2024-05-28T18:38:32+5:302024-05-28T18:38:41+5:30
नाना जाधव भादोले : भादोले येथील श्रीवर्धन संदीप पाटील दहावी परीक्षेत ६८ टक्के गुणासह उत्तीर्ण झाला. पण आपले हे ...

Kolhapur: दहावी चांगल्या गुणाने पास झाला, पण ते पहायला 'तो' नाही
नाना जाधव
भादोले : भादोले येथील श्रीवर्धन संदीप पाटील दहावी परीक्षेत ६८ टक्के गुणासह उत्तीर्ण झाला. पण आपले हे यश पहायला तो या जगात नसल्याने त्याच्या आईने गुणपत्रक पाहून हंबरडा फोडला. तिच्या रडण्याने उपस्थित ग्रामस्थसही गहिवरले.
श्रीवर्धनने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. सुट्टीत २७ एप्रिल रोजी तो मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेला होता. पोहताना फिट आल्याने त्याचा बूडून मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असणा-या मित्रांनाही हे लवकर समजले नाही. काही वेळानंतर श्रीवर्धनची कपडे विहिरीच्या काठावर दिसून आली; परंतु श्रीवर्धन दिसून आला नसल्याने तो विहिरीत बुडाला असल्याचे समजले.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज श्रीवर्धन असता तर निश्चितपणे हा निकाल आनंदाने साजरा केला असता, अशी प्रतिक्रिया त्याच्या घरच्या व्यक्तींनी दिली. हे सांगत असताना मात्र त्यांच्या घरच्यांनाही अश्रूंचा बांध फुटला होता.