Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक वाढविण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध, अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:58 IST2025-07-16T12:57:44+5:302025-07-16T12:58:09+5:30
संचालक मंडळाची सभा : अगोदर चर्चा करा, तोपर्यंत प्रलंबित ठेवण्याची सूचना

Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक वाढविण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध, अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले..
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) संचालक वाढविण्यास संचालिका शौमिका महाडिक यांनी लेखी विरोध नोंदवला. मंगळवारी संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मंडळ २१ वरून २५ करण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. त्यास त्यांनी विरोध करत चर्चा केल्याशिवाय हा विषय मंजूर करू नये, असे त्यांनी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना सांगितले.
‘केडीसीसी’ बँकेप्रमाणे ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक मंडळ वाढवून ते २५ करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांची संख्या वाढविण्याचा विषय ठेवण्यात आला होता. त्याला सभेत शौमिका महाडिक यांनी आक्षेप घेतला. पहिल्यांदा नेत्यांशी चर्चा करा, मगच विषय मंजुरीस ठेवा असे त्यांनी सांगितले. तरीही सर्व विषय मंजूर केल्यानंतर त्यांनी याबाबतच्या विरोधाचे पत्र अध्यक्ष मुश्रीफ यांना दिले.
याशिवाय सभेत ताळेबंदावर चर्चा करण्यात आली. आगामी सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अहवाल कशा पद्धतीने सादर करायचा याबाबतही चर्चा झाली. घट-वाढीसह इतर बाबींचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. याबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी संचालिका शौमिका महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
प्रत्येक संचालकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संचालिका शौमिका महाडिक यांनी संचालकांची संख्या वाढविण्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत, ते आम्ही सकारात्मक घेतले आहेत. भविष्यातील गरजांनुसार संचालक वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. संघ सर्वांचा असल्याने येथे एकतर्फी निर्णय होत नाहीत. - नविद मुश्रीफ अध्यक्ष, ‘गोकुळ दूध संघ कोल्हापूर