Kolhapur: शिवाजी विद्यापीठाच्या अंदाजपत्रात संशोधनासाठी तब्बल २२७ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:46 IST2026-03-12T19:45:21+5:302026-03-12T19:46:05+5:30
विद्यार्थिनींची वसतिगृहे होणार चकाचक

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाच्या अंदाजपत्रात संशोधनासाठी तब्बल २२७ कोटी
कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिवाजी विद्यापीठानेसंशोधनात्मक सुविधांवर भर देतानाच २०२६-२७ साठी ५८७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. तब्बल ८ कोटी ९१ लाख रुपयांच्या तुटीचे हे अंदाजपत्रक असून, ही तूट विद्यापीठ निधीतील शिलकेतून भरून काढण्यात येणार आहे.
कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात अधिसभा झाली. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. डॉ. रघुनाथ ढमकले यांनी २०२६-२७चे अंदाजपत्रक मांडले. यावर सदस्यांनी चर्चेनंतर मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात संशोधनाला चालना देण्यात आली असून, तब्बल २७ कोटी रुपयांची तरतूद संशोधनासाठी केली आहे.
विभाग - जमा अपेक्षित - खर्च अपेक्षित
- प्रशासकीय - ४७ कोटी ५८ लाख - ६२ कोटी ९७ लाख
- शास्त्र अधिविभाग - ५ कोटी ४० लाख - ८ कोटी १४ लाख
- इतर अधिविभाग - ३ कोटी ५९ लाख - ७ कोटी ७१ लाख
- इतर उपक्रम - ३५ कोटी ४८ लाख - ५५ कोटी ६६ लाख
- वेतन अनुदान - १५४ कोटी ५१ लाख - १६३ कोटी ५१ लाख
- विविध संस्था - ५ कोटी ०६ लाख - २ कोटी ३७ लाख
- संशोधन-विकास निधी - ३१ कोटी ६४ लाख - ३१ कोटी ६४ लाख
- घसारा निधी - १३ कोटी ७७ लाख - १३ कोटी ७७ लाख
- निलंबन लेखे - २८१ कोटी ८४ लाख - २४२ कोटी ०१ लाख
संशोधनाला मिळणार चालना
दर्जेदार संशोधन होण्यासाठी पुस्तके, जर्नल खरेदी व ग्रंथालयासाठी २ कोटी ६५ लाख, संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी ४ कोटी १४ लाख, संगणक, फर्निचर, इलेक्ट्रिकलच्या पायाभूत सुविधांसाठी १५ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
विद्यार्थिनींची वसतिगृहे होणार चकाचक
विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद केली आहे. नवीन वसतिगृहासाठी २ कोटी ५० लाख, वसतिगृह दुरुस्ती, मेसची दुरुस्ती व दैनंदिन खर्चासाठी २ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. रिसर्च स्कॉलर होस्टेलसाठी १२ लाखांची तरतूद केली आहे.
मैदानांच्या देखभालीसाठी ३४ लाख
विद्यापीठातील मैदानांच्या देखभाल - दुरुस्तीसाठी घसारा निधीतून ३४ लाख रुपयांची तरतूद केली असून, खेळाचे साहित्य खरेदीसाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेता यावा, यासाठी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
११ विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण
विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून, याचा अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला. यात ११ विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे नमूद केले आहे.