Kolhapur: टाकवडेत विनापरवाना उभारलेला शिवरायांचा पुतळा उतरवला, गावात दिवसभर तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:45 IST2025-05-15T11:44:48+5:302025-05-15T11:45:19+5:30
पोलिस-जमावात झटापट

Kolhapur: टाकवडेत विनापरवाना उभारलेला शिवरायांचा पुतळा उतरवला, गावात दिवसभर तणाव
कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीसमोर मंगळवारी रात्री अज्ञातांनी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसिवला. रीतसर परवानगी घेऊन पुतळा बसवावा अशी भूमिका घेत प्रशासनाने बुधवारी सायंकाळी पोलीिस बंदोबस्तात तो उतरविला, मात्र यावेळी जमावाची पोलिसांशी जमावाची झटापट झाली. उतरविलेला पुतळा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
टाकवडे (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीसमोर मंगळवारी रात्री अज्ञातांनी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसविला. बुधवारी पहाटे ही घटना समजताच पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी, पथक गावात दाखल झाले. प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत आणि गावातील प्रमुख मंडळींंची बैठक घेऊन विनापरवाना पुतळा बसविणे चुकीचे आहे, तो काढून घ्यावा, रीतसर परवानगी घेऊन त्याची प्रतिष्ठापना करावी, अशी वारंवार विनंती केली.
मात्र ग्रामस्थांनी ती मान्य न केल्याने अखेर पोलिस बंदोबस्तात पुतळा हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गावात जमावबंदी लागू केली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात पुतळा उतरविण्यात येत असताना बॅरिकेड्स ढकलून जमावाने ग्रामपंचायत परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व जमावात झटापट झाली.
पोलिसांनी जमावाला पांगवल्यानंतर प्रशासनाने पुतळा उतरविला आणि सुरक्षित ठिकाणी हलविला. दरम्यान, सायंकाळी जमावाने घोषणाबाजी करत गावातील सर्व सीमा बंद करून रस्त्यावर टायर पेटविल्या. यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
महापुरुषांचे पुतळे बसविताना त्यांचे पावित्र्य, सुरक्षा राखली पाहिजे. त्यासाठी रीतसर परवानगी आवश्यक असते. ग्रामस्थांना स्वत:हून पुतळा उतरविण्याची वारंवार विनंती केली. मात्र, त्यांनी हतबलता दाखविल्याने आम्ही सन्मानपूर्वक पुतळा उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे. - मौसमी चौगुले, प्रांताधिकारी, इचलकरंजी