Municipal Election 2026: इचलकरंजीत काँग्रेस, उद्धवसेनेला धक्का; संजय कांबळे, सयाजी चव्हाण महायुतीच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:12 IST2025-12-20T18:12:12+5:302025-12-20T18:12:12+5:30
जागा उपलब्ध करून देण्यासह पक्षप्रवेश करण्याचे नियोजनही सुरू

Municipal Election 2026: इचलकरंजीत काँग्रेस, उद्धवसेनेला धक्का; संजय कांबळे, सयाजी चव्हाण महायुतीच्या वाटेवर
इचलकरंजी : शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय कांबळे, उद्धवसेनेचे शहरप्रमुख सयाजी चव्हाण आणि त्याच पक्षातील युवा पदाधिकारी शिवाजी पाटील हे तिघे महायुतीमधील विविध घटक पक्षांच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिव-शाहू आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. त्यामध्ये काही पक्षांमध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. शिव-शाहू आघाडीतील मुख्य घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष कांबळे हे भाजपच्या वाटेवर असून, हाळवणकर गटासोबत त्यांची चर्चा झाल्याचे समजते. त्या माध्यमातून त्यांना उमेदवारीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासह पक्षप्रवेश करण्याचे नियोजनही सुरू आहे.
त्याचबरोबर उद्धवसेनेचे शहरप्रमुख सयाजी चव्हाण हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना उमेदवारीसाठी जागा निर्माण केल्यानंतर त्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे तसेच उद्धव सेनेतील युवा पदाधिकारी पाटील हेही भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेसोबत चर्चेत असल्याचे समजते.
चर्चेला उत्तर नाही
गेल्या दोन दिवसांपासून संजय कांबळे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला शुक्रवारी अन्य सूत्रांकडून दुजोरा मिळाला. याबाबत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
शिंदेसेनेबाबत चर्चा झाली असली तरी प्रवेशाबाबत अद्याप निश्चित काहीच नाही. योग्यवेळी तुम्हाला माहिती देऊ. - सयाजी चव्हाण
भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यासह सर्वच पक्षांसोबत आपले चांगले संबंध आहेत. कामानिमित्त भेटी होत असतात. परंतु प्रवेशाबाबत अद्याप निश्चित नाही. ठरल्यास नक्कीच सांगू. - शिवाजी पाटील