वस्तुसंग्रहालयातून उलगडणार शाहूचरित्र
By Admin | Updated: February 15, 2017 23:54 IST2017-02-15T23:54:53+5:302017-02-15T23:54:53+5:30
जन्मस्थळासाठी दरपत्रक निविदा प्रसिद्ध : दरानुसार पहिल्या टप्प्यातील अंदाजपत्रक तयार करणार

वस्तुसंग्रहालयातून उलगडणार शाहूचरित्र
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहूंचे जीवनचरित्र तत्कालीन जीवनशैली, कुस्तीचे अॅनिमेशन, खडखडा, वाद्ये, भांडी, राजेशाही थाटाची अनुभूती देणाऱ्या वस्तू, भांडी, खेळ, वाद्ये अशा विविधांगांतून उलगडत जाणार आहे. त्यासाठी शाहू जन्मस्थळामध्ये साकारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयासाठीच्या साहित्याचे दरपत्रक मागविण्याची निविदा बुधवारी पुरातत्त्व खात्याच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दरानुसार पहिल्या टप्प्यातील दोन कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे.
कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असून, आता मुख्य वस्तुसंग्रहालयाच्या आराखड्यानुसार पुढील काम सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या वस्तुसंग्रहालयासाठी दोन कोटींचा निधी पुरातत्त्व खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या रकमेत प्राथमिक टप्प्यातील कामांना सुरुवात करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शाहू महाराजांची दुर्मीळ छायाचित्रे हाय रिझॉल्युशनमध्ये कॉपिंग आणि प्रिंट करण्यात येणार आहेत. जन्मस्थळ कक्षामध्ये राजेशाही लुक असलेले नक्षीदार वुलन्स, काचेच्या हंड्या बसविलेले पितळी झुंबर, कोल्हापूर संस्थानची राजचिन्हे, सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातांचे व पायांचे ठसे चांदीच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहेत. पंचधातू, फायबर माध्यमात म्युरल्स तयार करण्यात येणार आहेत. दिलेल्या प्रसंगानुसार कॅनव्हासवर तैलरंग अॅक्रॅलिक माध्यमात चित्रे तयार करणे, पंचधातंूमध्ये घोड्याचा पुतळा, तत्कालीन वाद्ये, साठमारीच्या खेळाची तसेच शेतीची अवजारे, तसेच फायबरमध्ये शाहू मिल्सची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. साकारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयासाठीच्या साहित्य व वस्तूंसाठी कारागीर, ठेकेदार, चित्रकार, शिल्पकार, एजन्सीज यांच्याकडून दरपत्रक मागविण्यासाठीची निविदा बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, २५ तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष शाहू जन्मस्थळ येथे निविदा भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या दरपत्रकावरून पुरातत्त्व खात्याला साहित्याच्या रकमेचा अंदाज येणार आहे. त्यावरून पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या
कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यावर कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या कामांना तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी त्यांचे दरपत्रक आवश्यक आहे. बाजारपेठेतून आलेल्या या दरांवरून दोन कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाची निविदा काढण्यात येईल. यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.
- उत्तम कांबळे, उपअवेक्षक,
शाहू जन्मस्थळ
कुस्तीचा अॅनिमेशन शो या संग्रहालयात दुर्मीळ छायाचित्रातील रथाप्रमाणे बर्माटिक लाकडात रथ तयार करून त्यात हत्ती व त्यावर बसलेल्या माहुताची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
शाहू महाराज ज्या खडखड्यात बसून फेरफटका मारायचे, तो घोड्याचा खडखडा ब्रॉँझ धातूत बनवून त्याचा सेट उभारण्यात येणार आहे.
याशिवाय कुस्तीच्या रोबोटिक अॅनिमॅओग्राफिक शोसाठी पैलवान इमाम बक्ष व गुलाम माहीद यांना सूचना देताना शाहू महाराज असे तीन रोबोटिक पुतळे आणि सेट असणार आहे.