'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:27 IST2025-05-27T12:26:37+5:302025-05-27T12:27:04+5:30
संचालकांची मते घेतली जाणून : शुक्रवारी बंद पाकिटातून नाव सभास्थळी जाणार

'गोकुळ' अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीबाबत सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या नेत्यांच्या बैठकीत शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शुक्रवारी (दि. ३०) बंद पाकिटातून हेच नाव संचालक मंडळाच्या निवड सभेत पाठवले जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय काेरे, माजी आमदार संजय घाटगे हे उपस्थित हाेते. या चार नेत्यांमध्ये बंद खोलीत अध्यक्ष पदाच्या नावासह आगामी निवडणुकीबाबत रणनीती चर्चा झाली. त्यानंतर आमदार कोरे, घाटगे बैठकीतून बाहेर पडले. मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांनी संचालकांशी चर्चा करून शुक्रवारी नावाचे बंद पाकीट पाठवून देतो, ते संचालक मंडळ बैठकीच्या अगोदर उघडण्याची सूचना केली.
पाच संचालक अनुपस्थित
सत्तारूढ गटाचे संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे व नवीद मुश्रीफ हे बैठकीला उपस्थित नव्हते. डोंगळे यांच्या बाबत विचारले असता, ते शनिच्या दर्शनाला गेल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तर, विरोधी गटाचे शौमिका महाडिक, बाळासाहेब खाडे, डॉ. चेतन नरके असे पाच संचालक अनुपस्थितीत होते.
यड्रावकरांनी व्यक्त केली नाराजी
‘गोकुळ’च्या निवडणुकीवेळी शाहू आघाडीमध्ये आम्ही होतो, पण सोमवारच्या बैठकीला आम्हाला बोलवले का नाही? अशी विचारणा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एका संचालकांना फोन करून केली.
पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
पालकमंत्री प्रकाश आबीटकर हे सोमवारी सायंकाळी सव्वासहापर्यंत जिल्हा परिषदेच्या आढावा बैठक व नागरिकांच्या गाठीभेटीत होते. पण, हाकेच्या अंतरावरील शासकीय विश्रामगृहातील बैठकीला ते गेले नाहीत. त्यांच्यासह माजी खासदार संजय मंडलीक, आमदार चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, राजेश पाटील हेही बैठकीला उपस्थित नव्हते. यापैकी नरके देवदर्शनासाठी, तर के. पी. पाटील हे आजारी असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईतील मदर डेअरी जागा घेणार
संघाची मुंबईतील दुधाची वाढती मागणी पाहून तिथे पॅकींग सेंटर विस्तारण्यासाठी जागेची गरज आहे. तिथेच मदर डेअरीची जागा द्यायची आहे, याबाबत मंत्री हसन मुश्रीफ हे ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष मिनेश शाह यांच्याशी फोनवरून बोलले. अध्यक्ष निवडीनंतर मुंबईसह पुण्यातील जागेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबतच्या सोमवारच्या बैठकीची मला कल्पना नव्हती किंवा कोणाचा निरोपही नव्हता. - आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर