कोल्हापूर : कागल तालुक्यातील एकोंडी गावात प्रचारासाठी आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आज, गुरूवारी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गप्रश्नी अडवून जाब विचारला. अचानकपणे त्यांचा ताफा अडवून रस्त्यावरच ठिय्या मारल्याने गोंधळ उडाला. यामुळे मुश्रीफ यांना वाहनातून उतरून संबंधीत शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमकपणे आचारसंहितेपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय का घेतला नाही ? असा प्रश्न विचारला.शक्तिपीठ महामार्ग विरोधात गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत. पण सरकारकडून महामार्ग रद्दचा निर्णय झाला नाही. नेते केवळ तोंडी आश्वासने देवून बाधित शेतकऱ्यांची बोळवण करीत राहिले. आचारसंहिता लागण्यापूर्वीच शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची लेखी अधिसूचना काढावी अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केली होती. पण सरकारने याकडे दूर्लक्ष केले. बाधीत शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे एकोंडी गावातील शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडवून नाराजी व्यक्त केली.आंदोलनात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे आनंदा पाटील, साताप्पा लोंढे, संतोष पवार, विष्णू वैराट, दिनकर लोंढे, सुभान वैराट, यशवंत मर्दानी, बाळासो लोंढे, संतोष लोंढे, यशवंत सुळगावे, विष्णू सुळगावे आदी शेतकरी सहभागी झाले होते.
Kolhapur: शक्तीपीठ महामार्गप्रश्नी शेतकऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांचा ताफा अडवला, रस्त्यावर ठिय्या मारत जाब विचारला
By भीमगोंड देसाई | Updated: October 17, 2024 15:16 IST