इचलकरंजी : शहापूर पोलिसांनी नऊ घरफोडी प्रकरणांचा उलगडा करत तब्बल ४४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. दीड महिन्यापूर्वी केलेली ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. हस्तगत दागिने आणि चारचाकी वाहन यांतील तफावतीवरून वडगाव आणि शहापूर पोलिसांत वाद झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना दिले. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.दरम्यान, अधीक्षक जाधव यांनी बुधवारी दिवसभर या घटनेशी संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचारी, चोरीचे दागिने हस्तगत केलेले सोनार यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेल्या कारबद्दलही मोठा संभ्रम निर्माण झाला असून, त्याबद्दलही कसून चौकशी सुरू आहे.घटनेची समजलेली पार्श्वभूमी अशी, तारदाळ (ता. हातकणंगले) येथील एका घरफोडी प्रकरणात अटक केलेल्या संशयितांकडून शहापूर पोलिसांनी इचलकरंजीसह जयसिंगपूर, सांगली, कुरुंदवाड, आदी ठिकाणच्या नऊ घरफोडी प्रकरणांचा उलगडा केला होता. त्यामध्ये सुमारे ४४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. या प्रकरणातील संशयितांना वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चोरीतील सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल शहापूर पोलिसांत जमा केल्याचे सांगितले.त्याची खातरजमा करण्यासाठी वडगाव पोलिसांनी शहापूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरून दोन्ही पोलिसांत मंगळवारी (दि. ३) वादावादीचा प्रकार घडला. याबाबतची माहिती अधीक्षक योगेशकुमार यांना समजली. त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊन अहवाल देण्याचे आदेश जाधव यांना दिले.त्यानुसार बुधवारी जाधव यांनी इचलकरंजीसह सांगली, जयसिंगपूर परिसरांतील काही सोनारांना चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यांच्याकडे चोरीतील दागिने तसेच जमा केलेला मुद्देमाल यांबाबतचा जबाब नोंदवून घेतला. तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेले शहापूरचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली. त्याचबरोबर वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्याकडेही त्यांनी चौकशी केली.
सोन्यातील तफावतीबाबतचा तपास करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सोनार यांच्याकडे चौकशी करून जबाब घेतले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाचा उलगडा करण्याचे काम सुरू आहे. त्याची आज, गुरुवारी अधिक चौकशी करून त्याचा अहवाल अधीक्षक योगेशकुमार यांच्याकडे पाठविला जाणार आहे. - अण्णासाहेब जाधव, अपर पोलिस अधीक्षक
घरफोडी चोरट्यांकडून सखोल तपास करत तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आणले. त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला. त्यावेळीही संबंधित आरोपींकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली होती. गुन्हे आणि जप्त मुद्देमाल यामध्ये एक मिलिग्रॅमचीही तफावत नाही. तसेच गुन्ह्यातील चारचाकी गाडी जप्तीबाबतच्या प्रकरणात आरोपींच्या नावावर संबंधित चारचाकी नसल्याने ती जप्त केली नव्हती. त्याबाबतही संबंधितांना अधिकाऱ्यांसमोर हजर केले आहे. - सचिन सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक, शहापूर
आम्ही एका घरफोडीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे तपास सुरू आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात मुद्देमाल जमा केल्याचे सांगितले. त्याची खातरजमा करण्यासाठी शहापूर पोलिसांकडे संपर्क साधला असता त्यावरून वाद झाला. याची अधिक चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. - प्रमोद शिंदे, पोलिस निरीक्षक, वडगाव
Web Summary : Shahapur police face inquiry over discrepancies in a burglary case involving 44 tolas of gold. Disputes arose between Vadgaon and Shahapur police regarding recovered jewelry and a vehicle, prompting investigation orders from Superintendent of Police Yogeshkumar Gupta.
Web Summary : शहापूर पुलिस 44 तोला सोने के गहनों से जुड़े चोरी के एक मामले में जांच का सामना कर रही है। बरामद गहनों और एक वाहन को लेकर वड़गांव और शहापूर पुलिस के बीच विवाद हुआ, जिसके बाद पुलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता ने जांच के आदेश दिए।